पहाटे पहाटेच कुर्ल्यात खळबळ! ब्रिजवरच बस-कंटेनरची जोरदार धडक, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धडाधड उड्या मारल्या
Kurla Bridge Bus Accident: कुर्ला ब्रिजवर सकाळी सहाच्या सुमारास बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी नाही मात्र बस आणि कंटेनरचं मोठं नुकसान झाले आहे.

मुंबईतल्या कुर्ला परिसरात आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. कुर्ला ब्रिजवर सकाळी सहाच्या सुमारास बस आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार, पावसामुळे रस्त्यावर तेल सांडले होते. त्यामुळे बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकला धडकली

या धडकेनंतर ट्रक ब्रिजवरच पलटी झाला. पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातात झालेल्या जखमींची आणि नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मुंबईच्या दिशेने प्रवाशांनी फुल भरलेली बस येत होती. तर मुंबईवरून कंटेनर नाशिकच्या दिशेने जात होता. सकाळी 6च्या सुमारास अपघात झाला असून अजूनही ब्रिजवरील वाहतूक बंद आहे.

प्रवाशांनी आपातकालीन दरवाजतुन उडी मारून आपला जीव वाचवला. या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी नाही मात्र बस आणि कंटेनरचं मोठं नुकसान झाले आहे.

अडीच तास उलटून देखील कुर्ला अपघात घटनास्थळी क्रेन यायला उशीर झाला. बस आणि कंटेनर याचा भीषण अपघात झाल्याने बस पूर्णपणे खाली झाली आहे. क्रेनच्या साहाय्याने बस आणि कंटेनर बाजूला करण्यात येणार आहे.