कमळी मालिकेत मोठा ट्विस्ट, नव्या अध्यायाची सुरुवात; अन्नपूर्णा आजींची होणार भेट
कमळी आणि अन्नपूर्णा आजींच्या या खास भेटीचा क्षण प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळणार आहे. 'कमळी' ही मालिका रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षरांच्या भेटीला येते.

काही नाती अशी असतात, जी काळाच्या ओघात आणि परिस्थितीमुळे दुरावतात पण त्यांच्यातील प्रेमाची ओढ कायम असते. अनेक वर्षांपासून हरवलेल्या आपल्या माणसाची वाट पाहणाऱ्या कुटुंबासाठी त्या व्यक्तीची भेट म्हणजे आनंदाचा आणि भावनांचा अनमोल क्षण असतो. झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतही आता असाच एक भावनिक आणि महत्त्वाचा टप्पा येणार आहे.
कमळीच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची वेळ जवळ आली असून, तिच्या आयुष्याला आता एक नवं वळण मिळणार आहे. अन्यायाच्या रावणाचे, म्हणजेच कामिनीचे दहन केल्यानंतर कमळी आणि राजन यांची भेट होणार आहे. या भेटीनंतर कमळीच्या आयुष्यातील आणखी एका महत्त्वाच्या नात्याचा उलगडा होणार आहे.
कमळीची आणि अन्नपूर्णा आजीची भेट होणार असून, या भेटीमुळे महाजन घराण्यात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. ज्या नातीची इतक्या दिवसांपासून प्रतीक्षा होती, ती हरवलेली नात अखेर अन्नपूर्णा आजींना पुन्हा भेटणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात कमळीच्या खऱ्या ओळखीबद्दल आणि तिच्या आयुष्यात पुढे काय घडणार, याबद्दल उत्सुकता होती.
आता या सगळ्या प्रश्नांना एक रंजक वळण मिळणार आहे. कमळी आणि अन्नपूर्णा आजींची भेट ही केवळ दोन व्यक्तींची भेट नसून, एका कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणारा भावनिक क्षण ठरणार आहे. या भेटीतून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, तर नव्या नात्यांची सुरुवातही होईल.
आतापर्यंत अनेक संकटांना धैर्याने सामोरी गेलेली कमळी आता आपल्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसणार आहे. अन्नपूर्णा आजींच्या रूपाने तिला कुटुंबातील प्रेम, माया आणि आपलेपणा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. मात्र, या नव्या नात्यांसोबत तिच्या आयुष्यात कोणते बदल घडणार, महाजन घराण्यातील नाती कशी खुलणार आणि कमळीचा पुढचा प्रवास कसा असेल, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.