Matheran: पावसाळ्यात माथेरानचा प्लॅन करताय? ‘ही’ गरजेची वस्तू नेता येणार नाही; वाचा नवीन नियम
पावसाळ्यात मुंबई-पुण्यातील अनेक पर्यटक माथेरानला भेट देतात. पावसाळी ट्रेकिंगसाठी सर्वांत लोकप्रिय हिल स्टेशन म्हणजे माथेरान. परंतु आता तिथे भेट देणाऱ्या पर्यटकांना एक गरजेची वस्तू नेता येणार नाही. हा नवीन नियम काय आहे, ते जाणून घ्या..

महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सह्याद्रीच्या डोंगररांगेत स्थित असलेलं एक लहान ऑफबीट हिल स्टेशन म्हणजे माथेरान. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी ह्यूग मालेट यांनी 1850 साली हे ठिकाण विकसित केलं होतं. याठिकाणी मुंबई आणि पुण्यातील पर्यटक वीकेंड ट्रिपसाठी आवर्जून येतात.

उन्हाळा, हिवाळा आणि विशेषकरून पावसाळ्यात इथला निसर्ग पाहण्यासारखा असतो. माथेरानमधील आल्हाददायक वातावरणात मन प्रसन्न होतं. आता याच माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. माथेरानमध्ये पर्यटकांना यापुढे प्लास्टिकचे रेनकोट वापरता येणार नाहीत.

पावसाळ्यात ट्रेकिंगला, भटकंतीसाठी असंख्य पर्यटक माथेरानला येतात. तेव्हा पावसापासून वाचण्यासाठी सोबत प्लास्टिक रेनकोट आणतात. प्रवासात सहज वापरता यावेत म्हणून अनेकजण प्लास्टिकचे 'यूज अँड थ्रो' रेनकोट वापरतात. मग परतीच्या प्रवासात ते रेनकोट तिथेच रस्त्यावर किंवा दऱ्याखोऱ्यात फेकतात. (pc: Yathra guruji)

प्लास्टिक रेनकोटच्या या कचऱ्यामुळे माथेरान या हिल स्टेशनचं विद्रुपीकरण होतं. तिथल्या पर्यटनासाठी आणि पर्यावरणासाठी हानी पोहोचत असल्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. माथेरान नगर परिषदेनं याचा विचार करत प्लास्टिक रेनकोटवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याच वर्षापासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. (pc: Yathra guruji)

माथेरान हे भारतातील सर्वांत लहान हिल स्टेशन आहे. जवळपास 7 किमी क्षेत्रात पसरलेल्या माथेरानची लोकसंख्या फक्त 6000 इतकी आहे. महाबळेश्वरप्रमाणेच माथेरानसुद्धा अनेक पॉईंट्ससाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी 35 हून अधिक पॉईंट्स आहेत. जिथून माथेरानचं सुंदर दृश्य पहायला मिळतं. (pc: Yathra guruji)