शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 6000 स्थळं नाकारली; 47 व्या वर्षीही हा लोकप्रिय अभिनेता सिंगल
ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर या अभिनेत्याशी लग्न करण्यासाठी तरुणींची रांगच लागली होती. शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल सहा हजार लग्नाची स्थळं त्याने नाकारल्याचं वृत्त आहे. वयाच्या 47 व्या वर्षीही हा अभिनेता सिंगलच आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रभास याचा आज 23 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातून जगभरात लोकप्रिय झालेल्या प्रभासने आपल्या दमदार अभिनयाने आणि भव्य व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आज प्रभासची ओळख केवळ दाक्षिणात्य अभिनेता म्हणून मर्यादित राहिलेली नाही, तर तो भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचा पॅन इंडिया स्टार बनला आहे.
प्रभासला आज संपूर्ण देशात याच नावाने ओळखलं जात असलं, तरी त्याचं पूर्ण नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलापाटी असं आहे. त्याचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी झाला. चित्रपटसृष्टीशी संबंधित कुटुंबातून आलेल्या प्रभासने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. प्रभासला अभिनयापेक्षा व्यवसायामध्ये अधिक रस होता. त्याला स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती.
प्रभासच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा चित्रपट म्हणजे एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि 2017 मधील ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ या दोन्ही चित्रपटांनी त्याला देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भूमिकेसाठी प्रभासने अनेक वर्षे मेहनत घेतली. त्याच्या दमदार शरीरयष्टीने, अभिनयाने आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थितीने प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटांनंतर प्रभासच्या नावाची चर्चा केवळ तेलुगू चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर हिंदीसह देशातील विविध भाषांमधील प्रेक्षकांमध्ये होऊ लागली.
प्रभासच्या चित्रपटांइतकीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा होत असते. त्याच्या लग्नाबाबत अनेकदा वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र, अभिनेत्याने आपल्या खासगी आयुष्याबाबत फारशी माहिती सार्वजनिक केलेली नाही. वयाच्या 47 व्या वर्षीही तो सिंगल आहे. बाहुबलीनंतर त्याला लग्नासाठी असंख्य स्थळं येत होती. त्याने तब्बल सहा हजार स्थळांना नाकारल्याचं म्हटलं जातं.
प्रभासचं नाव अनेकदा दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टीशी जोडलं गेलं आहे. मात्र दोघांनीही या वृत्तांना फेटाळत आम्ही चांगले मित्र आहोत, असं म्हटलं होतं. अनुष्का आणि प्रभासने बाहुबली या चित्रपटात काम केलं होतं.