वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही… जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा पाहाच

पुण्याच्या भोर तालुक्यातील भाबवडी गावातील बुदगुडे बंधूंनी आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ घरासमोर हुबेहूब फायबरचा पुतळा आणि स्मारक उभारून एक आगळावेगळा आदर्श समाजसमोर ठेवला आहे.

| Updated on: May 29, 2026 | 3:08 PM
1 / 6
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी अनेक प्रकारे प्रयत्न केल्याची उदाहरणे आपण पाहतो. मात्र, पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील भाबवडी गावातील बुदगुडे बंधूंनी एक पाऊल पुढे टाकत, समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ या मुलांनी घरासमोरील अंगणातच त्यांचे देखणे स्मारक उभारले आहे.

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलांनी अनेक प्रकारे प्रयत्न केल्याची उदाहरणे आपण पाहतो. मात्र, पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील भाबवडी गावातील बुदगुडे बंधूंनी एक पाऊल पुढे टाकत, समाजासमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ या मुलांनी घरासमोरील अंगणातच त्यांचे देखणे स्मारक उभारले आहे.

2 / 6

भाबवडी गावचे प्रथम सरपंच कै. ज्ञानोबा दगडोबा बुदगुडे (पाटील) यांना शेती आणि सामाजिक कार्याची विशेष आवड होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे सुपुत्र सेवानिवृत्त प्राचार्य रमेश बुदगुडे आणि महानंदा डेअरीचे सेवानिवृत्त सहाय्यक व्यवस्थापक अनंता बुदगुडे यांनी हे स्मारक साकारले आहे.

3 / 6

या स्मारकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, अंगणात एका मंदिराची निर्मिती करून त्यात वडिलांचा हुबेहूब फायबरचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. केवळ वडिलांचाच नव्हे, तर त्यांच्यासोबत आयुष्यभर शेती फुलवणारी त्यांची आवडती 'सर्जा-राजा' ही बैलजोडी आणि घराचा राखणदार 'रॉकी' (श्वान) यांचेही फायबरचे पूर्णाकृती पुतळे येथे उभारण्यात आले आहेत.

4 / 6

या माध्यमातून बुदगुडे कुटुंबाने वडिलांविषयीचे अपार प्रेम व्यक्त केले आहे. या स्मारकातील मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त भाबवडी गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री रानजाई माता देवीचा अभिषेक, ग्रामदेवतांची पूजा आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला.

5 / 6

दुपारी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरापासून ते मूर्ती स्थापना स्थळापर्यंत ढोल-लेझिमच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मूर्तीची प्रतिष्ठापना व शास्त्रोक्त पूजन पार पडले. महाप्रसादानंतर भाबवडी व खानापूर येथील ग्रामस्थ मंडळांनी सुश्राव्य भजनांचे सादरीकरण केले. या संपूर्ण सोहळ्याचे नेटके नियोजन ज्ञानोबा माऊली सहारा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.

6 / 6

कै. ज्ञानोबा बुदगुडे यांनी आपल्या मुलांना उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले. त्यांनी आयुष्यभर कुटुंब, नातेवाईक आणि गावासाठी दिलेली आपुलकी आजही ग्रामस्थ विसरलेले नाहीत. वडिलांच्या पश्चात त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मुलांनी उभारलेले हे स्मारक पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत असून, बुदगुडे कुटुंबाच्या या कृतीचे पंचक्रोशीतून प्रचंड कौतुक होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us