Rain Alert : दिवाळीत पाऊस घालणार धुमाकूळ? ‘या’ भागांना अलर्ट
दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज. कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे आणि मुंबईत पाऊस पडणार का? जाणून घ्या सविस्तर.

नैऋत्य मोसमी पावसाने देशातून माघार घेतली असली, तरी महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हवामान प्रणाली विकसित होण्याचे संकेत मिळत आहेत.
19 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. अहिल्यानगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
20 ऑक्टोबर रोजी रायगड, पुणे, सातारा, बीड आणि परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि साताऱ्याच्या घाट परिसरातही वादळी पावसाचा अंदाज आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सध्या उकाडा आणि तीव्र उष्णतेचा अनुभव येत आहे. हवामानातील बदलामुळे 20 ऑक्टोबरच्या सुमारास मुंबईसह आसपासच्या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांतही आगामी काळात पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार, 22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे संकेत आहेत. 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष पावसाचे प्रमाण आणि ठिकाण हवामान प्रणालीच्या हालचालींवर अवलंबून असल्याने पुढील अंदाज महत्त्वाचे ठरणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारल्याने आणि परतीच्या पावसाचा अभाव जाणवल्याने राज्यातील काही भागांत खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे; मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचा पिकांवरील परिणाम यावर परिस्थिती अवलंबून राहील.