Raja Shivaji : 75 कोटींचा बजेट, ‘राजा शिवाजी’ सिनेमाने किती कमावला नफा? बॉक्स ऑफिसवर सिंहगर्जना
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाने कमाईचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. इतक्या दिवसांत या चित्रपटाने बजेटच्या तुलनेत किती नफा कमावला आहे, ते जाणून घेऊयात..

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. ‘माऊथ पब्लिसिटी’चाही या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला. रितेशच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता, कारण गेल्या दहा वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करतोय. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून त्यापैकी मराठी व्हर्जनने सर्वाधिक कमाई केली आहे. भारतात सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटाचा एकूण बजेट किती आहे आणि बॉक्स ऑफिसवर त्याच्या तुलनेत किती नफा कमावला आहे, ते जाणून घेऊयात..
‘राजा शिवाजी’ चित्रपटाने किती कमावला नफा?
‘कोईमोई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा बजेट जवळपास 75 कोटी रुपये इतका आहे. तर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने भारतात एकूण 102.90 कोटी रुपये ग्रॉस कमाई केली आहे. तर नेट कलेक्शनचा आकडा 87 कोटी रुपये इतका आहे. ओव्हरसीज म्हणजेच परदेशातील मार्केटमध्ये या चित्रपटाने 4.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जर बजेटशी या आकड्याची तुलना केली तर या चित्रपटाने 16 टक्के नफा आधीच निर्मात्यांना दिला आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा एकूण बजेट- 75 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन नेट- 87 कोटी रुपये
बॉक्स ऑफिस कलेक्शन ग्रॉस- 102.90 कोटी रुपये
नफा- 12 कोटी रुपये
गुंतवणुकीवरील नफा- 16%
‘राजा शिवाजी’ चित्रपटाची कमाई
ऐतिहासिक कथानक असलेल्या या चित्रपटाने 11.35 कोटी रुपयांनी ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 10.55 कोटी रुपये कमावले होते. तिसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 5.6 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 4.9 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 4.25 कोटी रुपये, सातव्या दिवशी 4 कोटी रुपये इतकी कमाई केली होती. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 52.65 कोटी रुपयांवर पोहोचला होता.
प्रदर्शनाचा आठवा दिवस- 3.2 कोटी रुपये
नऊवा दिवस- 5.6 कोटी रुपये
दहाा दिवस- 6.80 कोटी रुपये
अकरावा दिवस- 2.4 कोटी रुपये
बारावा दिवस- 2.5 कोटी रुपये
तेरावा दिवस- 1.9 कोटी रुपये
चौदावा दिवस- 1.9 कोटी रुपये