Rajinikanth: सून घरात येण्यापूर्वीच रजनीकांत यांना 500 कोटींची लॉटरी; फक्त 8 दिवसांत झाली कमाल
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर हा आयपीएलमधील ‘सनराइजर्स हैदराबाद’ची मालकीण काव्या मारनशी लग्न करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तबही झाला आहे. रजनीकांत यांची पत्नी लता या अनिरुद्धच्या आत्या आहेत.

रजनीकांत यांच्या घरात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदरचा लग्नसोहळा पार पडण्याआधी आणि घरात सून येण्याआधीच रजनीकांत यांना मोठी लॉटरी लागली आहे. ही लॉटरी तब्बल 500 कोटींची आहे. यानिमित्ताने रजनीकांत यांची लोकप्रियता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे.
रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाने जगभरातील कमाईत मोठी झेप घेतली आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या सहा दिवसांत या चित्रपटाने जगभरात 500 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, या दमदार कमाईसह ‘जेलर 2’ हा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चित्रपटाच्या यशामुळे रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवरील दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
‘जेलर 2’ हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने भारतात सुमारे 59.70 कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत घट झाली आणि चित्रपटाने 37.10 कोटी रुपये कमावले. मात्र, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला झाला. तिसऱ्या दिवशी 47.25 कोटी, तर चौथ्या दिवशी 55.85 कोटी रुपयांची कमाई झाली.
पहिल्या आठवड्यातील या दमदार कामगिरीमुळे चित्रपटाने प्रेक्षकांना मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे आकर्षित केले. सहाव्या दिवशीही चित्रपटाची कमाई मजबूत राहिली. ट्रेड रिपोर्टनुसार, सहाव्या दिवशी भारतात चित्रपटाने सुमारे 45.55 कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवरील एकूण नेट कलेक्शन 287.80 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं.
‘जेलर 2’ने केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातील चित्रपटगृहांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. सहा दिवसांनंतर चित्रपटाची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई सुमारे 541 ते 542 कोटी रुपयांच्या दरम्यान नोंदवण्यात आली. त्यामुळे 500 कोटींचा टप्पा पार करण्याचा विक्रम चित्रपटाने आपल्या नावावर केला आहे.