मराठीसह हिंदीतही सई ताम्हणकरचा दबदबा; दिग्दर्शकांची ठरतेय पहिली पसंत
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या दमदार अभिनयकौशल्याच्या आणि विविधांगी भूमिकांच्या जोरावर मराठीसह हिंदीतही आपला दबदबा निर्माण केला आहे. ओटीटीवरील उत्तम प्रोजेक्ट्समध्ये ती झळकत आहे.

हिंदीसोबत मराठी इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकरने कामाचं सातत्य जपत, वैविध्यपूर्ण भूमिका आणि वेगळ्या कथांवर काम करत दोन्ही सिनेविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ओटीटी, चित्रपट अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर तिच्या दमदार अभिनयाच्या चर्चा बघायला मिळतात.

'मटका किंग' ही वेब सीरिज जगभरात ट्रेंड झाल्यानंतर आता सई पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि तितक्याच दर्जेदार मराठी चित्रटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार आहे. 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटात सई एका लक्षवेधी भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सईची भूमिका ही तितकीच वेगळी आणि लक्षवेधी ठरणार असल्याचं म्हटलं जातंय.

2025 मध्ये सईने 'गुलकंद' चित्रपटात एक सुंदर भूमिका साकारली होती. आता 2026 मध्ये 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. कधीही न थांबणारी सतत वेगळ्या धाटणीच्या भूमिका करणारी सई ही नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांच मन जिंकून घेताना दिसते.

सई ताम्हणकरने आजवर केलेल्या भूमिका या कायम कौतुकास्पद राहिल्या आहेत. गुलकंद, पाँडिचेरी, दुनियादारी, मिडियम स्पायसी, कुलकर्णी चौकातला देशपांडे, वजनदार, यांसह मानवत मर्डर्स, बेरोजगार, डब्बा कार्टेल, अग्नी, ग्राऊंड झिरो, मिमी, मटका किंग अशा मराठी-हिंदी चित्रपट वेब सीरिजमधल्या तिच्या भूमिका या नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या आहेत.

येणाऱ्या काळात देखील सई हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत अजून दर्जेदार कथा आणि वेगवेगळ्या भूमिकामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. सोशल मीडियावरही तिचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. इन्स्टाग्रामवर सईचे 34 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.