Sameera Reddy : 4 हजार स्क्वेअर फुटांचं घर, आजूबाजूला हिरवळ अन् फळांनी लगडलेली झाडं; पाहा समीरा रेड्डीचा आलिशान आशियाना!
समीरा रेड्डी काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झगमगाटापासून दूर जाऊन गोव्यात स्थायिक झाली. काही दिवसांपूर्वी अर्चना पूरण सिंग यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये समीराच्या आलिशान घराची झलक दाखवली होती, जे घर चोहोबाजूंनी हिरवाईने वेढलेलं आहे. तिच्या बागेत नारळापासून ते चीकू, काजूचीही झाडं आहेत.

अभिनेत्री समीरा रेड्डी मुंबईतून गोव्याला शिफ्ट झाली आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या कुटुंबियासह मुंबईला रामराम करत गोव्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. तिने पक्त शहर बदललं नाही तर जीवन जगण्याची पद्धतही बदलली. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर समीरा बऱ्याचदा हिरवाईन नटलेलं तिचं घर आणि आसपासचा परिसर, गार्डन यांची झलक दाखवत असते. काही काळापूर्वी अभिनेत्री अर्चना पूरण सिंग ही तिच्या कुटुंबासह समीराच्या गोव्याच्या घरी गेली होती, तिच्या व्लॉगमधून त्यांनी तिच्या घराची 'होम टूर' दिली. तेव्हा समीराने तिचा आलिशान बंदला तर दाखवलाच, पण आजूबाजूची हिरवाई, फळा-फुलांनी लगडलेले वृक्ष हेही दाखवलं. ( All Photos : Instgram)
समीरा रेड्डीचं गोव्यातील घर उंचच उंच पामची झाडं आणि विविध फळझाडांनी वेढलेलं आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री तिच्या बागेत पिकणाऱ्या फळांचा आणि इतर गोष्टींचाही पुरेपूर वापर करते. समीरा रेड्डीच्या घरातील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे घराभोवती असलेली हिरवळ. तिचं घर बांबू, कडुलिंब, चिकू, नारळ, काजू आणि अगदी अॅव्होकॅडोच्या झाडांसह अनेक स्थानिक आणि उष्णकटिबंधीय झाडांनी वेढलेलं आहे.
अर्चना पूरण सिंह आणि तिच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना समीराने सांगितलं होतं की, ती सुरुवातीला फक्त 10 दिवसांसाठी गोव्याला आली होती; मात्र त्यानंतर ती पुन्हा कधीच परतली नाही. मुंबई सोडून गोव्यातच स्थायिक होण्याचा निर्णय तिने घेतला.
अभिनेत्रीने गोव्यातील घरातील अनुभव सांगताना म्हटलं की, सुरुवातीला तिला तिथे स्थिरस्थावर होण्यासाठी थोडा त्रास झाला. कारण घराच्या आसपास फारसं काही नव्हतं आणि ती नेहमी शहरातील वातावरणात राहिली होती. तिच्या घराच्या आजूबाजूला दूरवर कुठेही फारशी वस्ती दिसत नव्हती.
गोव्यातील सुमारे 4 हजार चौरस फुटांच्या या घरात राहायला आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घरात साप दिसला. तो पाहून ती खूप घाबरली होती. मात्र, हळूहळू तिला तिथे राहण्याची सवय झाली आणि त्या वातावरणाची आवडही निर्माण झाली.
समीराने सांगितलं की, पूर्वी तिचे खूप नखरे असायचे; मात्र गोव्यात राहायला आल्यानंतर तिने स्वतःमध्ये अनेक बदल केले. झाडू मारण्यापासून, घर पुसण्यापर्यंत आणि घरातील इतर कामांपर्यंत सर्व गोष्टी तिने स्वतः करायला शिकून घेतल्या.
कामाबद्दल सांगायचं झालं, तर समीरा रेड्डी अनेक वर्षांनंतर यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘आखिरी सवाल’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत नमाशी चक्रवर्ती, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.
अभिजीत मोहन वारंग यांनी दिग्दर्शित केलेला हा राजकीय विषयावरील चित्रपट 15 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात संजय दत्तने प्राध्यापक गोपाल नाडकर्णी यांची भूमिका साकारली होती.