धुरंधर नाही तर थिएटरमध्ये फ्लॉप झालेला सारा अर्जुनचा हा चित्रपट OTT वर होतोय ट्रेंड; IMDb वर 8.1 रेटिंग
या चित्रपटाची कथा विंध्या वेमुलपल्लीवर आधारित असून ती कॉलेजची मुख्याध्यापिका असते. हायकोर्टात जाऊन तिने स्वत:च्याच विरोधात खटला दाखल केला आहे. ती असं का करते, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चित्रपट पहावा लागेल.

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये यलिना जमालीची भूमिका साकारून अभिनेत्री सारा अर्जुनने प्रेक्षकांची मनं जिंकली. परंतु सध्या ती 'धुरंधर 2'मुळे नाही तर तिच्या दुसऱ्याच एका चित्रपटामुळे विशेष चर्चेत आली आहे.

सारा अर्जुनचा 'युफोरिया' हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. 'युफोरिया' हा एक सोशल थ्रिलर चित्रपट असून यामध्ये साराने अशा मुलीची भूमिका साकारली आहे, जी एका कठीण परिस्थितीत अडकते. या चित्रपटात समाजातील अनेक गंभीर मुद्द्यांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न झाला आहे.

सारा अर्जुनचा 'युफोरिया' हा चित्रपट 'धुरंधर 2'च्या एक महिन्याआधी म्हणजेच 6 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर तो फारसा चालला नाही. परंतु आता ओटीटीवर येताच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

या चित्रपटाची कमाई कमी असली तरी त्याची कथा आणि विषय या दोन्ही गोष्टींची प्रशंसा होत आहे. हा चित्रपट ETV Win या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. हा चित्रपट ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय.

या चित्रपटात सारा अर्जुनसोबतच 'तेरे नाम' फेम अभिनेत्री भूमिका चावलासुद्धा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या कंटेंटमुळे त्याला कोणताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर खरेदी करत नव्हता, अशी खंत दिग्दर्शक गुना शेखरने व्यक्त केली होती.

या चित्रपटात सारा अर्जुन आणि भूमिका चावला यांच्यासोबतच विग्नेश गाविरेड्डी, गौतम मेनन, पृथ्वीराज अड्डला, लिखिता यलमंचली यांच्यासारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.1 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे.