दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
नाशिक येथील भोंदूबाबा प्रकरण सध्या संपूर्ण देशाता चर्चेत आहे. या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणामुळे संसदेत खिल्ली उडवल्याचे म्हटले आहे.

लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली. दैवी शक्ती असल्याचे सांगून अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. अशोक खरात विरोधात जवळपास 15 गुन्हे दाखल झाले आहेत. आता या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "खरात प्रकरणामध्ये जी भयानक गोष्ट झाली आहे. जी माणुसकीला काळीमा फासणारी अशी ही गोष्ट आहे. अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरंतर हा खूप मोठा धक्का आहे."

पुढे त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशात मी माझा संसदेतील अनुभव सांगते आमली चेष्टा करुन ठेवली आहे या खराताने. कारण राज्यामध्ये, देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमध्ये सातत्याने सगळे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात. ते चेष्टा करायला लागले आहेत की हे तुमच्या महाराष्ट्रात काय चालले आहे? ज्या पद्धतीने काही लोकांचे व्हिडीओ येतायेत हे खूप दुर्दैवी आहे."

अशोक खरातची सध्या एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये दररोज नवनवीन खुलासे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच सुत्रांनी माहिती दिली की अशोक खरातने तुरुंगात देखील भविष्यवाणी केली.

अशोक खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी अनेक गुन्हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित आहेत. SIT च्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात धार्मिक विधी, जादूटोणा आणि दैवी शक्ती दाखवण्याच्या नावाखाली महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे.