‘वीण दोघांतली..’मधील स्वानंदीच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधानला मिळतं इतकं मानधन; तिची संपत्ती किती?
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतील स्वानंदी आणि समरची जोडी सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये तुफान हिट ठरतेय. स्वानंदीच्या भूमिकेसाठी तेजश्री प्रधान किती मानधन घेते, हे तुम्हाला माहीत आहे का?

अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शुभ्रा, जान्हवी आणि आता स्वानंदी अशा विविध भूमिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'अग्गंबाई सासूबाई', 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकांमध्ये तिने दमदार भूमिका साकारल्या आहेत.

तेजश्रीचा जन्म 2 जून 1988 रोजी झाला. वयाच्या पंधराव्या वर्षीच तिने व्यक्तिमत्त्व विकासाच्या कोर्समध्ये भाग घेतला आणि त्याचसोबत अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षातच तिला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून तिने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तर 'झेंडा' हा तिचा पहिला चित्रपट ठरला.

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील तिची जान्हवीची भूमिका विशेष गाजली. तर 'ती सध्या काय करते' हा तिचा चित्रपट आजही अनेकांच्या आवडीचा आहे. तेजश्री सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामधील स्वानंदी आणि समर यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हिट ठरतेय.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतील स्वानंदीच्या भूमिकेसाठी तेजश्रीला प्रत्येक एपिसोडसाठी 15 ते 20 हजार रुपये मानधन मिळत असल्याचं समजतंय. दर महिन्याला तेजश्री चार ते सहा लाख रुपयांपर्यंत कमाई करते. तर तिची एकूण संपत्ती जवळपास 20 ते 30 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय.

तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त अंकुश चौधरीने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. 'ती सध्या काय करते, हे लोकांना आजही पडलेलं कोडं आहे. पण तिचा अनुराग म्हणून मला माहीत आहे, ती सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. तुझी मैत्री आजही तितकीच हक्काची आहे', अशा शब्दांत अंकुश व्यक्त झाला.