Snake : सरपटत नाही, चक्क चाकासारखा गोल फिरतो हा साप; जगातील या दुर्मिळ सापाची खासियत जाणून व्हाल थक्क
या पृथ्वीवर सापांचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी काही अत्यंत विषारी असतात, तर काही बिनविषारी असतात. सर्वांना माहित आहे की बहुतेक साप सरपटतात, पण तुम्ही अशा सापाबद्दल ऐकले आहे का जो सरपटण्याऐवजी चाकासारखा गोल गोल फिरतो? तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल खालील माहिती लगेच वाचा.

साप खूप लांब असतात. ते खूप वेगाने सरपटतात. पण एक असाही छोटा साप आहे जो न सरपटता चाकासारखा गोल गोल फिरू शकतो. तर तुम्हाला काय वाटतं, तो कोणता साप असेल? ड्वार्फ रीड स्नेक (खुजा पाणसाप). हा सर्वात लहान आणि दुर्मिळ साप आहे. त्याचे शास्त्रीय नाव स्युडोरहॅबडियन लॉंगीसेप्स (Pseudorhabdion longiceps) आहे. तो कॅलमारिया (Calamaria) प्रजातीचा आहे.
मात्र, हा साप फक्त २० ते २५ सेमी लांब असतो. तो दिसायलाही खूप वेगळा असतो. तो प्रामुख्याने तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतो. त्याचे पोट पिवळ्या, लाल आणि पांढऱ्या रंगाचे असते. तथापि, काही लोकांना वाटते की हा एक धोकादायक साप आहे. पण तो बिनविषारी साप आहे.
ड्वार्फ रीड स्नेक हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे. त्यामुळे माणसांना कोणतीही इजा होत नाही. तथापि, जर या सापाला धोका जाणवला, तर तो सरपटण्याऐवजी आपल्या शरीराला चाकाप्रमाणे वळवून घरंगळत दूर जातो. मात्र, असे घरंगळत असतानाही तो आपले डोके सरळ ठेवतो आणि खाली वाकत नाही.
त्यामुळेच अनेक लोक या सापाला रोलर स्नेक असेही म्हणतात. असेही म्हटले जाते की, जमिनीवर सरपटणाऱ्या सापापेक्षा तो खूप वेगाने घरंगळतो. तज्ज्ञांच्या मते, जगातील कोणताही साप इतक्या वेगाने घरंगळू शकत नाही.
हा साप प्रामुख्याने दमट जंगलांमध्ये पानांखाली आणि मातीत लपून आढळतो. तो गांडूळ आणि लहान कीटक खातो. तो भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि पश्चिम घाटात क्वचितच दिसतो.