‘ऑब्सेशन’चाही बाप आहे हा 22 वर्षे जुना चित्रपट; थिएटरमध्येच अनेकांची उडालेली घाबरगुंडी
सध्या सर्वत्र 'ऑब्सेशन' या हॉलिवूड हॉरर चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मात्र 22 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये यापेक्षाही जबरदस्त हॉरर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

'ऑब्सेशन' या हॉलिवूड हॉरर थ्रिलर चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) दहा पैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. परदेशात या चित्रपटाची छप्परफाड कमाई तर होतच आहे, पण भारतातही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय.

पण तुम्हाला माहीत आहे का, 22 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अशाच एका प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीची कथा दाखवण्यात आली. 2004 मध्ये प्रदर्शित झालेला हा हिंदी चित्रपट खरंतर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. संतराम वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट नंतर टीव्हीवर 'कल्ट' ठरला.

आजही या चित्रपटाला सर्वोत्तम हॉरर आणि सायकोलॉजिकल थ्रिलर मानलं जातं. या चित्रपटाचं नाव आहे 'कृष्णा कॉटेज'. सोहैल खान, ईशा कोपिकर, अनिता हसनंदानी आणि रती अग्निहोत्री यांच्या यात भूमिका होत्या. 'कृष्णा कॉटेज'ची कथा ही 'ऑब्सेशन'पेक्षाही अधिक भयानक आणि घाबरगुंडी उडवणारी आहे.

या चित्रपटात एक तरुणी प्रेमात इतकी वेडी होते, की मेल्यानंतरही ती प्रियकराची पाठ सोडत नाही. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि युट्यूबवर सहज पाहू शकता. हा चित्रपट जरी फ्लॉप ठरला असला तरी यातील सीन्स आणि कथेची चर्चा आजही होते.

बॉलिवूडमध्ये हॉरर चित्रपट चांगल्या बनवल्या जात नाही, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र 'कृष्णा कॉटेज' या चित्रपटाला टीव्हीवर प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती. बॉलिवूडमधल्या क्लासिक हॉरर चित्रपटांचा विषय निघाला की आजही या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून होतो.