
भात आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करार झालेला आहे. या कराराचा मसुदा तयार करण्याचे काम सध्या चालू आहे. या करारामुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांना मोठा फायदा होणार आहे. या कराराअंतर्गत भारत अमेरिकेकडून विमान, विमानाचे सुटे भाग, इंधनाची आयात करणार आहे.

या कराराला अंतिम रुप देण्यासाठी भारताचे प्रतिनिधी अमेरिकेत जाणार होते. परंतु त्याआधीच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तेथील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेला 100 पेक्षा जास्त देशांवरील टॅरिफ असंवैधानिक असल्याचा निर्वाळा दिलेला आहे.

या निकालानंतर अनिश्चितता निर्माण झाल्यानंतर भारतीय प्रतिनिधींचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. भारतासोबत हा करार करताना अमेरिकेने काही दावे केले होते. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्यास सहमती दाखवली असून भारत आता अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडून कच्च्या तेलाची आयात करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते.

भारताने मात्र याबाबत अद्याप थेट स्पष्टीकरण दिलेले नाही. असे असतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. व्हेनेझुएला या देशातून भारतात कच्च्या तेलाचा मोठा साठा येत आहे. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार व्हेनेझुएलामधून साधारण 20 लाख बॅरेल कच्चे तेल भारतात येत आहे.

याआधी अमेरिकेने व्हेनेझुएलावर काही बंधनं घातली होती. त्यामुळे व्हेनेझुएलाकडून भारताला कच्चे तेल मिळण्यात अडचण येत होती. आता अमेरिकेने व्हेनेझुएलावरील निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे व्हेनेझुएलाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलात वाढ झालेली आहे.