कोण होती रील स्टार रोहिणी पाराध्ये? ज्या हॉटेलमध्ये बनवले रील्स, तिथेच संपवलं आयुष्य
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी रील स्टार रोहिणी पाराध्येनं टोकाचं पाऊल उचललं आहे. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील ही घटना आहे. मंगळवारी दुपारी तिने तिच्याच हॉटेलच्या किचनमध्ये स्वत:ला संपवलं.

इन्स्टाग्रामवर रील्स बनवून आजवर अनेकजण रील स्टार बनले. सोशल मीडियावर अनेकदा मनोरंजनाने परिपूर्ण रील्स पोस्ट करणाऱ्यांच्या खऱ्या आयुष्यात काय समस्या असतील, याचा अंदाज मात्र कोणालाच बांधता येत नाही. सोलापुरातील मंगळवेढ्यातील रोहिणी पाराध्ये या रील स्टारने टोकाचं पाऊल उचलल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं 25 वर्षांच्या रोहिणी पाराध्येनं हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्या हॉटेलच्या किचनमध्ये तिने अनेक रील्स बनवले होते, ज्यांना नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये तिने तिचं आयुष्य संपवून सर्वांनाच मोठा धक्का दिला.

रोहिणीने निलेश पाराध्येशी लग्न केलं होतं. हे दोघं इन्स्टाग्रामवर रील्स बनवून अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. 'हॉटेल ग्रामपंचायत' नावाने त्यांचा स्वत:चा व्यवसाय होता. गेल्या काही वर्षांपासून दोघंही सोशल मीडियावर सक्रिय होते आणि त्यातून त्यांच्या हॉटेल व्यवसायालाही फायदा मिळत होता.

विविध सामाजिक विषयांवर, महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीवर आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीवर रोहिणी रील्स बनवायची. याच रील्सच्या आधारे तिने इन्स्टाग्रामवर मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. रील्समधून प्रसिद्धी मिळू लागताच हॉटेलचा व्यवसायसुद्धा तेजीत होता.

रोहिणी आणि निलेश यांनी त्यांच्या हॉटेलची आणखी एक नवीन शाखा सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र त्याआधीच रोहिणीने टोकाचं पाऊल उचलत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. रोहिणीच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.