लिफ्ट किंवा बेसमेंटमध्ये गेल्यावर मोबाईल नेटवर्क गायब का होते? भुताटकी नाही तर…
डिजीटल युगातही लिफ्ट किंवा बेसमेंटमध्ये मोबाईल नेटवर्क गायब का होते? यामागे 'फॅराडे केज' आणि रेडिओ लहरींचे विज्ञान नेमके काय आहे, तसेच या समस्येवर काय उपाय करता येतील, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

हल्लीच्या डिजीटल युगात नेटवर्क आणि इंटरनेट या आपल्या मुलभूत गरजा बनल्या आहेत. पण आजही तुम्ही कधी इमारतीच्या बेसमेंट किंवा लिफ्ट गेलात तर तुमच्या मोबाईलचे सिग्नल अचानक गायब झाल्याचे पाहायला मिळते.

लिफ्टमध्ये असताना सुरु असलेला फोन अचानक कट होणे किंवा इंटरनेट पूर्णपणे बंद पडणे, या गोष्टी वारंवार आपल्यासोबत घडतात. पण हे नेमकं का घडतं, यामागचे प्रमुख कारण आज आपण जाणून घेऊया.

बेसमेंट आणि लिफ्टच्या बांधकामात जाड काँक्रीट आणि लोखंडी सळईंचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मोबाईलचे नेटवर्क हे रेडिओ लहरींवर (Radio Waves) आधारित असते. या लहरी जाड भिंती आणि धातूंना भेदून पलीकडे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे बेसमेंटमध्ये त्या अत्यंत कमकुवत होतात. कधी कधी त्या पूर्णपणे रोखल्या जातात.

लिफ्ट ही पूर्णपणे धातूची बनलेली एक बंद पेटी असते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, ही लिफ्ट एका 'फॅराडे केज' (Faraday Cage) प्रमाणे काम करते. धातूचे हे आवरण बाहेरील इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलला आत येण्यापासून पूर्णपणे रोखते. त्यामुळेच लिफ्टचे दार बंद होताच तुमच्या फोनमधील सिग्नल गायब होते.

बेसमेंट हे जमिनीच्या खाली असते. मोबाईल टॉवर्स जमिनीच्या वर उंचावर असतात. टॉवर आणि तुमच्या फोनमध्ये जमीन, खडक आणि इमारतीचा पाया असे अनेक अडथळे आल्यामुळे सिग्नलची फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही.

आजच्या काळात आपण 4G किंवा 5G नेटवर्क वापरतो. या हाय-फ्रिक्वेन्सी लहरी डेटाचा वेग जास्त देतात, पण त्यांची भिंती भेदण्याची क्षमता कमी असते. याउलट, जुने 2G सिग्नल काही प्रमाणात अशा ठिकाणी काम करू शकतात, पण 5G च्या बाबतीत हे कठीण असते.

मोठ्या मॉल्स किंवा कार्यालयांमध्ये आता सिग्नल रिपीटर्स किंवा बूस्टर बसवले जातात, ज्यामुळे बेसमेंटमध्येही रेंज मिळते. जर बेसमेंटमध्ये वाय-फाय उपलब्ध असेल, तर तुम्ही तुमच्या फोनमधील 'Wi-Fi Calling' फीचर सुरू करून नेटवर्क नसतानाही स्पष्टपणे बोलू शकता.

दरम्यान तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले, तरी विज्ञानाचे साधे नियम आजही नेटवर्क रोखून धरतात. त्यामुळेच लिफ्टचे दार बंद होताच आपण क्षणभर जगापासून तुटतो.