देवाच्या मूर्ती भेट म्हणून देणे योग्य की अयोग्य? शास्त्राचे नियम काय सांगतात?
देवाच्या मूर्ती भेट म्हणून देणे शास्त्रात का वर्ज्य मानले आहे? यामागील धार्मिक कारणे, वास्तुदोष आणि उपासनेचे नियम यावर आधारित सविस्तर माहिती या बातमीत वाचा.

भारतीय संस्कृतीत सण-समारंभ किंवा शुभ कार्यात भेटवस्तू देण्याची जुनी परंपरा आहे. अनेकदा आपण कोणाच्या गृहप्रवेशाला किंवा लग्नाला देवाच्या मूर्ती भेट म्हणून देतो. पण अनेकदा अशा भेटवस्तू देणं टाळावं, असा सल्ला दिला जातो.

अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने देवाच्या मूर्ती भेट म्हणून देणे नेहमीच शुभ मानले जात नाही. यामागे काही महत्त्वाची कारणे सांगितली जातात. जेव्हा आपण कोणाला मूर्ती देतो, तेव्हा त्या मूर्तीची नियमित पूजा-अर्चा, स्नान आणि नैवेद्य होणे आवश्यक असते.

जर समोरच्या व्यक्तीला वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे त्या मूर्तीची शास्त्रोक्त पूजा करता आली नाही, तर तो देवतेचा अपमान मानला जातो आणि त्याचे दोष मूर्ती देणाऱ्यालाही लागू शकतात, अशी धारणा आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, घराची लक्ष्मी किंवा कुलदैवताची प्रतिमा दुसऱ्याला देणे म्हणजे आपल्या घरातील बरकत किंवा सकारात्मक ऊर्जा दुसऱ्याला देण्यासारखे आहे. विशेषतः गणपती आणि महालक्ष्मीच्या मूर्तीबाबत हा नियम अधिक कटाक्षाने पाळला जातो.

प्रत्येक मूर्तीची स्थापना करण्यासाठी वास्तूशास्त्रानुसार ठराविक दिशा आणि स्थान असते. भेट मिळालेली मूर्ती जर चुकीच्या ठिकाणी ठेवली गेली, तर त्याचा घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

भेटवस्तू नेताना किंवा ठेवताना मूर्तीला साधा तडा गेला किंवा तिचा कोणताही भाग खंडित झाला, तर ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत ती मूर्ती विसर्जित करावी लागते, ज्यामुळे भेट देणाऱ्याच्या भावना दुखावू शकतात.

जर तुम्हाला एखाद्याला आध्यात्मिक भेट द्यायचीच असेल, तर मूर्तीऐवजी धार्मिक ग्रंथ, पोथी किंवा संतांची चरित्रे भेट देणे अधिक श्रेयस्कर मानले जाते. तसेच, जर समोरच्या व्यक्तीने स्वतःहून एखाद्या विशिष्ट मूर्तीची मागणी केली असेल, तरच ती भेट म्हणून द्यावी.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)