वाय-फायचा स्पीड वाढवायचा? मग महिन्यातून फक्त 2 वेळा करा एकच काम
घरात वाय-फाय असूनही इंटरनेट स्लो चालतंय? राउटरच्या चुकीच्या जागेमुळे हा त्रास होऊ शकतो. इंटरनेटचा स्पीड रॉकेटसारखा वाढवण्यासाठी राउटर कुठे आणि कसा ठेवावा, याच्या सोप्या टिप्स जाणून घ्या

आजच्या डिजीटल युगात वाय-फाय (Wi-Fi) हा प्रत्येक घराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. घरामध्ये एकाच कनेक्शनद्वारे अनेक उपकरणांना हाय-स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी आपण राउटरचा वापर करतो. परंतु, अनेकदा घरात वाय-फाय असूनही इंटरनेटचा स्पीड कमी मिळतो.

या समस्येमागे अनेकदा राऊटरमधील दोष नसून त्याची चुकीची जागा कारणीभूत असते. जर तुम्हालाही कमकुवत वाय-फाय सिग्नल आणि स्लो इंटरनेटचा त्रास होत असेल, तर राउटरची जागा बदलून तुम्ही हा प्रॉब्लेम सहज सोडवू शकता. चांगल्या इंटरनेट स्पीडसाठी राउटर कुठे आणि कसा ठेवावा, याबद्दलची माहिती आता समोर आली आहे.

राउटर कधीही घराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात किंवा टोकाला ठेवू नका. तो नेहमी घराच्या मध्यवर्ती ठिकाणी (Center) ठेवावा, जेणेकरून सर्व खोल्यांमध्ये वाय-फायचा सिग्नल एकसारखा आणि मजबूत मिळेल.

राउटर कधीही जमिनीवर किंवा अगदी खाली ठेवू नये. तो जमिनीपासून किमान ५ ते ७ फूट उंचीवर ठेवावा. वाय-फायचे सिग्नल्स हे खालच्या दिशेने प्रवास करत असल्याने उंचीवर ठेवल्यास कव्हरेज उत्तम मिळते.

वायफाय राऊटर हे सिमेंटच्या किंवा भक्कम भिंतींच्या अगदी जवळ ठेवणे टाळा. भक्कम भिंतींमुळे वाय-फाय लहरी अडखळतात. त्यामुळे सिग्नल कमकुवत होतो.

अनेक दिवस राउटर सलग सुरू राहिल्याने त्याचा वेग मंदावू शकतो. त्यामुळे महिन्यातून किमान १ ते २ वेळा राउटर रीस्टार्ट (Restart) केला पाहिजे. यामुळे राउटरची कार्यक्षमता सुधारते. तसेच इंटरनेटचा वेग स्थिर राहण्यास मदत होते. राउटरची छोटीशी सेटिंग बदलून तुम्ही तुमच्या घरातील इंटरनेटचा स्पीड आणि कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या वाढवू शकता.