मुंबईच्या रस्त्यांसाठीचे 5 हजार कोटींचे टेंडर रद्द, तुमच्या मर्जीतील लोकांना टेंडर मिळालं नाही का?; आदित्य ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Nov 18, 2022 | 5:52 PM

5 हजार कोटींच्या टेंडरमध्ये कोणी आले नाही का? तुमची माणसं आली नाही म्हणून टेंडर दिलं नाही का? असा सवाल करतानाच आता मुंबईच्या रस्त्यांचं काय होणार हे कुणालाच माहीत नाही.

मुंबईच्या रस्त्यांसाठीचे 5 हजार कोटींचे टेंडर रद्द, तुमच्या मर्जीतील लोकांना टेंडर मिळालं नाही का?; आदित्य ठाकरे यांचा सवाल
आदित्य ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यात खोके सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे. आमचं सरकार पडल्यावर खोके सरकार आलं. मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या रस्त्यांसाठी 5 हजार कोटी देण्याची घोषणा केली होती. मुंबई खड्डे मुक्त करू असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर रस्त्यांसाठी 5 हजार कोटींचे टेंडर काढले गेले. पण, पाच दहा दिवसांपूर्वीच हे टेंडर रद्द केले आहे, असा आरोप करतानाच तुमच्या मर्जीतील लोकांनी टेंडर भरले नाही म्हणून टेंडर रद्द केलं का? असा सवाल माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. मुंबई महापालिकेत आम्ही प्रत्येक वर्षी दोन ते अडीच हजार कोटीचे टेंडर काढत असतो. टप्प्याटप्प्याने ते काम करत असतो. सर्व रस्त्यांवर एकत्र काम करण्याची कुठेही परवानगी मिळत नाही. हे आम्हाला माहीत होतं.

हे सुद्धा वाचा

सरकारला माहीत होतं की नाही माहीत नाही. त्यामुळे सरकार खोटं बोलतंय हे समजत होतं. रस्त्याखाली 42 युटीलिटी असतात. मुंबईत 16 प्लानिंग एजन्सी असतात आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन काम करावं लागतं. हे या सरकारला माहीतच नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

5 हजार कोटींच्या टेंडरमध्ये कोणी आले नाही का? तुमची माणसं आली नाही म्हणून टेंडर दिलं नाही का? असा सवाल करतानाच आता मुंबईच्या रस्त्यांचं काय होणार हे कुणालाच माहीत नाही, असं ते म्हणाले.

पाच हजार कोटींच्या रस्ते कामांच्या घोषणेमुळे गेल्यावर्षीची कामे आणि या वर्षीची कामेही सुरू झाली नाहीत. येत्या पावसाळ्यात मुंबई तुंबली तर त्याला जबाबदार कोण? महापौर आणि स्थायी समिती अस्तित्वात नसताना राज्य सरकारने एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा? असा सवालही त्यांनी केला.

1700 कोटी रुपये मुंबईच्या ब्युटिफिकेशनसाठी जाहीर झाले आहेत. नगरसेवकांचा हा निधी असतो. हा पैसा नगरसेवकांच्या विभागासाठी न वापरता इतर कामांसाठी वळवला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

खोके सरकारमुळे पाच उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. पंचनामे झाले नाही. निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक व्हावी लागते तीही झाली नाही. तरीही खोके सरकार राजकारणावर फोकस आणत आहे, अशी टीका त्यांनी केली.