Narayan Rane : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

| Updated on: Apr 18, 2024 | 1:58 PM

Narayan Rane : कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मंत्री राहिलेल्या नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील. किरण सामंत यांनी माघार घेतल्यानंतर नारायण राणे यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.

Narayan Rane : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
narayan rane
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते महायुतीचे उमेदवार असतील. मागच्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन तिढा निर्माण झाला होता. कारण भाजपा आणि शिवसेना शिंदे गट दोघांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. अखेर आज किरण सामंत यांनी माघार घेत असल्याच जाहीर केलं. त्यानंतर नारायण राणे यांचा मार्ग मोकळा झाला. “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच, राणेंनी त्यांच्या ग्रामदेवतेचे सपत्नीक दर्शन घेतले. कुठलंही काम सूरु करायचं असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तर मी ग्रामदेवतच दर्शन घेतो” असं प्रतिपादन नारायण राणे यांनी केलं.

“सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघात जागा वाटपाबाबत कोणताही तिढा नव्हता. हा पक्षाचा युक्तीवाद होता. मला उमेदवारी मिळणार हे अगोदरच माहीत होते. त्यामुळे मी प्रचाराला सुरवात केली होती” असं नारायण राणे म्हणाले. “विकासाचा व मोदींचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. 400 पार करायचं आहे. विकसित देश बनावा, आत्मनिर्भर बनावा हे आपले प्रचाराचे मुद्दे असतील” असं नारायण राणे म्हणाले.

सामंत बंधुंचे यावेळी नारायण राणे यांनी आभार मानले. “मी त्यांचा आभारी आहे. त्यासोबत मोदी, अमित शहा, नड्डा, फडणवीस यांनी मला उमेदवारी दिली त्याबद्धल मी त्यांचा आभारी आहे” असं नारायण राणे म्हणाले.

‘आमचा फेविकॉलचा जोड दिसेल’

“उमेदवारी जाहीर करण्यासाठी उशीर झालेला नाही. आम्ही आधीपासूनच काम करत होतो” असं नितेश राणे म्हणाले. “किरण सामंत हे नाराज नाहीत, या निवडणुकीत आम्ही एक साथ काम करू. या दरम्यान तुम्हाला आमचा फेविकॉलचा जोड दिसेल. राणे आणि सामंत मिळून निवडणुकीला सामोरे जाऊ” असं नितेश राणे यांनी सांगितलं.

“देवेंद्र फडणवीस यांना भेटलेला माणूस खाली हात येत नाही. याचा प्रत्यय लवकरच तुम्हाला येईल” असं किरण सामंत आणि फडणवीस भेटीवर नितेश राणे यांनी विधान केलं.