मुसलमान तरुणांना गरब्याला यायचे असेल तर आई आणि… भाजप आमदाराची मोठी मागणी
नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात वाद पेटला आहे. आता त्याचे पडसाद संपूर्ण देशाता पाहायला मिळत आहेत.

राज्यात सण साजरे करण्यावर सतत वाद सुरु आहेत. सण-उत्सावरुन राज्यात राजकीय पक्ष आमने-सामने आल्याचे दिसत आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवातील डीजे बंदीनंतर भाजप नेत्याने नवरात्रीबद्दल मोठे विधान केले. मंत्री नितेश राणे यांनी थेट गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको, मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको असे म्हटले. आता याचे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. नवरात्री उत्सव जवळ आला असताना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गरबा कार्यक्रमांतील मुस्लिम तरुणांच्या सहभागाबाबत भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी दिलेल्या विधानाने राजकीय वाद निर्माण झाला आहे. हुजूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या शर्मा यांनी एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना मुस्लिम तरुणांना गरब्याला एकटे येण्याऐवजी कुटुंबासोबत येण्याचा सल्ला दिला.
शर्मा म्हणाले, “मुसलमान तरुणांना गरब्याला यायचे असेल तर त्यांनी आपली आई, बहिणी आणि मुलींना सोबत घेऊन यावे. एकटे येऊन हिंदू मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला सडेतोड उत्तर दिले जाईल.” त्यांनी पुढे सांगितले की, गरबा हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून सनातन धर्मातील माँ जगदंबाची आराधना आहे. जर मुस्लिम बांधवांना सनातन धर्माची आस्था असेल तर ते कायमस्वरूपी येऊ शकतात, मात्र त्यांनी जय श्रीराम म्हणावे, कपाळावर तिलक लावावे आणि गौमातेची रक्षा करावी.
वाचा: मी अमृतावहिनींसोबत…गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
शर्मा यांचे विधान चर्चेत
शर्मा यांनी स्पष्ट केले की, केवळ मुले एकट्याने येण्याऐवजी संपूर्ण कुटुंबासोबत यावे. “आमचे तरुणही तयार आहेत,” असे ते म्हणाले. या विधानाचा अर्थ हिंदू तरुणांनीही मुस्लिम युवतींशी संवाद साधण्याची तयारी असल्याचे काहींनी काढला आहे. शर्मा यांनी लव्ह जिहादसारख्या घटनांना रोखण्यासाठी सनातनी तरुणांच्या प्रतिकाराची चेतावणीही दिली.
या विधानानंतर काँग्रेस आमदार आरिफ मसूद यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी शर्मा यांना ‘नफरती चिंटू’ म्हटले आणि अशा भाषेचा वापर न करण्याची सूचना केली. एआयएमआयएमच्या नेत्यांनीही या विधानाची निंदा केली आणि ते देशातील एकता बिघडवणारे असल्याचे म्हटले.
रामेश्वर शर्मा हे भोपाळमधील हुजूर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत. ते पूर्वीही धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवर विवादास्पद विधाने करण्यासाठी ओळखले जातात. नवरात्रीपूर्वी गरबा पॅंडलांमधील गैर-हिंदू सहभागाबाबत गेल्या काही वर्षांत मध्य प्रदेशात अनेकदा वाद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शर्मा यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते राजकीय चर्चा आणि आरोप-प्रत्यारोपांचे केंद्र बनले आहे. प्रशासन आणि पोलिसांनी मात्र सध्या शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. नवरात्री उत्सव शांततेने पार पडण्यासाठी सर्व पक्षांनी संयम राखावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.