Uddhav Thackeray : ‘पवारांना भेटण्याआधी ठाकरे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते’ दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 27, 2022 | 8:58 AM

उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीवर बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांना भेटण्यापूर्वी ठाकरे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते, असे त्यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray : पवारांना भेटण्याआधी ठाकरे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य
Follow us on

मुंबई :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाला मिळणारा आमदारांचा पाठिंबा वाढतच असल्याने शिवसेनेची (Shiv Sena) चिंता वाढली आहे. बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शरद पवारांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते, असं वक्तव्य बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. चुकीचे सल्ले देणाऱ्यांमुळेच आज शिवसेना अडचणीत आल्याचेही केसरकर यांनी म्हटले आहे. सुरुवातीला बोलणी सुरू होती. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर शिवसेनेने अधिक आक्रमक भूमिका घेतल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. केसरकर यांनी ‘टीव्ही9’शी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

…त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली

दरम्यान आमदारांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा सुरुवातीला शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना भावनिक आव्हान देखील केले होते. मी मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे, मात्र बंडखोरांनी समोर येऊन मला तसे सांगावे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे अधिक आक्रम झाले. यावर बोलताना केसरकर म्हणाले की, सुरुवातीला उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी  तडजोड करण्यास तयार होते. मात्र शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. चुकीचे सल्ले देणाऱ्यांमुळेच आज शिवसेना अडचणीत आल्याचेही केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

केसरकरांचा राऊतांवर निशणा

यावेळी बोलताना दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे.  संजय राऊत आम्हाला प्रेतं म्हणाले. मात्र संजय राऊत हे आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून आले आहेत. शिवसेनेनं आणखी चांगले सल्लागार सोबत ठेवण्याची गरज आहे. काही शांत लोक देखील शिवसेनेमध्ये आहेत, मात्र त्यांचं शिवसेनेत किती ऐकलं जातं हे मी इथे सांगू शकत नाही, असेही केसरकर यांनी यावेळी म्हटले आहे. हिंदुत्त्वाच्या भूमिकेबाबत बोलताना केसरकर म्हणाले की, हिंदुत्त्वाची भूमिका सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची होती. मात्र शिवसेनेने चुकींच्या लोकांसोबत आघाडी केली. म्हणूनच हे एवढे मोठे बंड झाले.