‘कोरोना’काळातही काका-पुतण्या संघर्ष, होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर

| Updated on: Apr 05, 2020 | 1:25 PM

संचारबंदीच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी मुंबई ते बीड असा प्रवास केल्याचा आक्षेप संदीप क्षीरसागर समर्थक नगरसेवकांनी घेतला होता. (Jaydutt Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar during Corona Lockdown)

कोरोनाकाळातही काका-पुतण्या संघर्ष, होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागरांचं उत्तर
Follow us on

बीड :कोरोना‘ काळात संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर शिवसेनेचे माजी मंत्री असलेले काका जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचा आमदार असलेला पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. आपण मुंबईहून नव्हे, तर औरंगाबादहून बीडला परतल्याचं स्पष्टीकरण जयदत्त क्षीरसागर यांनी दिलं आहे. (Jaydutt Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar during Corona Lockdown)

संचारबंदीच्या काळात जयदत्त क्षीरसागर यांनी मुंबई ते बीड असा प्रवास केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्या गटातील नगरसेवकांनी जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वारंटाइन करा, अशी मागणी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती.

जिल्हाबंदीचे आदेश असतानाही जयदत्त क्षीरसागर यांनी प्रवेश केला कसा? असा सवाल उपस्थित करुन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे तक्रार केली होती. जयदत्त क्षीरसागर यांना होम क्वारंटाइन करण्याची मागणीही झाली होती.

दरम्यान, मी मुंबई नव्हे तर औरंगाबाद येथून बीड जिल्ह्यात प्रवेश केला. हा प्रवास करण्यासाठी मी रीतसर परवानगी काढली होती, असा दावा जयदत्त क्षीरसागर यांनी केल्यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या गटातील नगरसेवक तोंडघशी पडले.

सध्या कोरोना विषाणू विरोधात लढाई सुरु आहे. अशात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनसेवा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, कालचा प्रकार हा बालिशपणाचे लक्षण आहे, असा टोला जयदत्त क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांचे नाव न घेता लगावला आहे.

जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील संघर्ष राज्यात नवीन नाही. विधानसभा निवडणुकीतही दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परंतु पुतण्याने काकाला पराभवाची धूळ चारली. जयदत्त क्षीरसागर यांनी गेल्या वर्षीच राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला.

(Jaydutt Kshirsagar Vs Sandeep Kshirsagar during Corona Lockdown)