कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीची गणितं काय?; राज ठाकरे यांचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र

| Updated on: Feb 05, 2023 | 11:08 PM

कलाटे मूळ शिवसेनेचे असल्याने ती जागा शिवसेनेसाठी सोडा, अशी विनंती उद्धव ठाकरे गटाने केली. मतदानावेळी अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळू शकते. राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीची मतं मिळाल्यास निवडणूक रंगतदार होईल.

कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीची गणितं काय?; राज ठाकरे यांचे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र
Follow us on

पुणे : कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची (By-election) धामधूम सुरू झाली. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी पत्र लिहिलं. कसबा, चिंचवड तोंडावर आल्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी पत्र लिहिलं. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहे. येथे भाजपनं दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. कसब्यातही भाजपनं उमेदवारी जाहीर केलाय. त्यानंतर काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलंय. उमेदवार शिवसेनेचा असल्यास आमचा पाठिंबा असेल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

चिंचवड विधानसभेत २०१९ ला लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांच्यात लढत झाली. जगताप ३४ हजार मतांनी जिंकले. कलाटे यांनीही लाखाहून जास्त मत घेतली होती. यावेळी राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळू शकतं.

हे सुद्धा वाचा

पण, कलाटे मूळ शिवसेनेचे असल्याने ती जागा शिवसेनेसाठी सोडा, अशी विनंती उद्धव ठाकरे गटाने केली. मतदानावेळी अश्विनी जगताप यांना सहानुभूती मिळू शकते. राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीची मतं मिळाल्यास निवडणूक रंगतदार होईल. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा जम बसविण्याचा प्रयत्न आहे.

कसबा विधानसभेत २०१९ मध्ये भाजपच्या मुक्ता टिळक आणि काँग्रेसचे अरविंद शिंदे यांच्यात लढत झाली होती. मुक्ता टिळक २८ हजार मतांनी जिंकल्या. अरविंद शिंदे यांना ४७ हजार मतं मिळाली. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपनं हेमंत रासने यांना तिकीट दिलं. यामुळं मुक्ता टिळक यांचे पती नाराजही झाले.

पण, सर्वेअंती हा निर्णय घेतला असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं. कसब्यात यावेळी काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारीची दाट शक्यता आहे. रासने आणि धंगेकर दोघेही मूळ कसब्यातले आणि जनसंपर्क असलेले नेते आहेत. परंतु, भाजपनं तीन इच्छुकांचे तिकीट नाकारले आहेत. त्यामुळं लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.