OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? भाजपचा सवाल; राज्यभर आंदोलनाचाही इशारा

| Updated on: Sep 14, 2021 | 3:12 PM

आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय कुटे व टिळेकर बोलत होते.

OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? भाजपचा सवाल; राज्यभर आंदोलनाचाही इशारा
योगेश टिळेकर, संजय कुटे
Follow us on

मुंबई : ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे. तशी घोषणाच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी मंगळवारी केली. आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय कुटे व टिळेकर बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. (MLAs Sanjay Kute and Yogesh Tillekar questions to Mahavikas Aghadi government)

संजय कुटे आणि टिळेकर यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

‘ठाकरे, पवारांनी पटोलेंच्या आरोपावर खुलासा करावा’

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे.विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही कुटे व टिळेकर यांनी नमूद केले.

चंद्रशेखर बावनकुळेंचाही हल्लाबोल

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षण गेलं. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगून ओबीसी आरक्षणासाठी उद्या राज्यात जोरदार आंदोलन करण्यात येईल. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार असल्याने त्यांनी संतापही व्यक्त केला.

‘सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार’

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ओबीसींना आरक्षण मिळालं नाही यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. हा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगतााच राज्य सरकार विरोधात उद्या भाजप राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकरांची थेट पोलिसात तक्रार

दरेकरांच्या ‘मुक्या’नं पक्षाची गोची? चंद्रकांत पाटील म्हणतात, त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता!

MLAs Sanjay Kute and Yogesh Tillekar questions to Mahavikas Aghadi government