दसरा मेळाव्यावरुन राजकारण..! कॉपी-पेस्टचा जमाना, शिवसेना नेत्याचा शिंदे गटाला खोचक टोला

| Updated on: Sep 30, 2022 | 4:25 PM

दसरा सणाच्या निमित्ताने राज्यभरातील शिवसैनिक एकत्र येतील आणि शिवतीर्थावरुन विचारांचे सोने लूटतील या भावनेने हा मेळावा सुरु करण्यात आला होता. आता ही परंपरा उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

दसरा मेळाव्यावरुन राजकारण..! कॉपी-पेस्टचा जमाना, शिवसेना नेत्याचा शिंदे गटाला खोचक टोला
शिवसेना पक्ष
Follow us on

महेश सावंत टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी सिंधुदुर्ग : उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा शिवतिर्थावर आणि शिंदे गटाला तर बीकेसी मैदनावर (BKC Ground) मेळावा घेण्याची परवानगी ही मिळालेलीच आहे. असे असताना आता कुणाच्या मेळाव्याला अधिकची गर्दी यावरुन राजकारण पाहवयास मिळत आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Gathering) घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने आपले पोस्टर्स सोशल मिडियावर टाकण्यात आले होते. तर आता टीझरही रिलीज करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही आपली भूमिका मांडली आहे. पण जमानाच कॉपी-पेस्टचा असला तरी विचाराचे काय असा सवाल खा. विनायक राऊत यांनी उपस्थित करुन शिंदे गटाला टोला लगावला आहे. कॉपी करण्याचा अनेकजण प्रयत्न करीत आहेत. पण शिवसेनेला एक वेगळा इतिहास असून तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काळातही पाहवयास मिळत असल्याचे राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना पक्षाला एक धोरण आहे. पक्षाचे धोरण आणि शिवसेना प्रमुखांचे विचार यावरच वाटचाल सुरु आहे. त्यामुळे एक नेता, एक झेंडा आणि एकच मैदान ही परंपरा यंदाही साधली जाणार असल्याचे विनायक राऊतांनी स्पष्ट केले आहे.

दसरा सणाच्या निमित्ताने राज्यभरातील शिवसैनिक एकत्र येतील आणि शिवतीर्थावरुन विचारांचे सोने लूटतील या भावनेने हा मेळावा सुरु करण्यात आला होता. आता ही परंपरा उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यंदाही विचारांचे सोने आणि अलोट गर्दी होईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे बॅनर समोर आल्यानंतर शिंदे गटाचेही आले. त्यानंतर टीझरच्या बाबतीतही तसेच झाले. अशा गोष्टी कॉपी-पेस्ट होऊ शकतात पण शिवसनेचे धोरण आणि विचार कसे कॉपी होतील असा सवालही शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला गेल्या 56 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे आमच्या मेळाव्याशी कोणीही स्पर्धा करु नये. कारण बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे यांच्या ताकदीचा अंदाज तुम्हाला येणार नसल्याचे विनायक राऊतांनी सांगितले.

दसरा मेळावा आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून आता आपण काय वेगळे करु शकतो असा प्रयत्न दोन्ही गटांकडून केला जात आहे. मात्र, आम्ही केल्यानंतरच त्याचे अनुकरण हे शिंदे गटाकडून केले जात असल्याचा आरोप राऊतांनी शिंदे गटावर केला आहे.