Pune Mosque : पुण्यातही दोन मंदिरांच्या जागी मशिदींची उभारणी? मनसेच्या दाव्यानंतर इतिहास संशोधक काय सांगतात?

| Updated on: May 23, 2022 | 10:46 PM

हतिहास संशोधक डॉ. संजय सोनवणी हे मनसे नेत्याचा दावा खोटा असल्याचं सांगत आहेत. 'या परिसरात शहाजीराजे यांची जहागिरी होती. नंतर पेशवाई आली. त्यांनी दर्ग्याला देणगी दिली, त्यामुळे या जागी मंदिर नसून दर्गा असल्याचा दावा इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी केलाय.

Pune Mosque : पुण्यातही दोन मंदिरांच्या जागी मशिदींची उभारणी? मनसेच्या दाव्यानंतर इतिहास संशोधक काय सांगतात?
पुण्यातील मंदिर मशिद वादावर इतिहास संशोधक डॉ. संजय सोनवणी यांचं मत
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : देशात सध्या ज्ञानवापीवरुन (Gyanvapi) जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता पुण्यातही मनसे नेत्याने केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. मनसेचे सरचिटणीस अयज शिंदे यांनी केलेल्या दाव्यानुसार पुण्यातही दोन मंदिरांच्या जागी मशिदी उभारण्यात आल्या आहेत. कसबा पेठ (Kasba Peth) परिसरात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या दोन मंदिरांच्या जागी छोटा शेख आणि बडा शेख अशा दोन मशीदी उभारण्यात आल्या आहेत. त्याबाबत आपण महापालिका आणि पुरातत्व विभागाला (Archeology Department) पत्र लिहिल्याचं अजय शिंदे यांनी सांगितलं. मात्र, हतिहास संशोधक हा दावा खोटा असल्याचं सांगत आहेत. ‘या परिसरात शहाजीराजे यांची जहागिरी होती. नंतर पेशवाई आली. त्यांनी दर्ग्याला देणगी दिली, त्यामुळे या जागी मंदिर नसून दर्गा असल्याचा दावा इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी केलाय.

इतिहास संशोधकांचा दावा काय?

मुळा नदीच्या काठी काही मंदिरं आहेत. शिवमूर्ती आहेत. जो दर्गा आहे त्याचा इतिहास वेगळा आहे. ज्या दोन पुराव्याच्या आधारे इथे मंदिर असल्याचा दावा केला जातोय, ते पुरावे कोर्टात टिकणारे नाहीत, असंही संजय सोनवणी यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर पुण्येश्वर मंदिरावरुन पुणे असं नाव पडल्याचा दावाही केला जातो तो धादांत खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. चौदाशेच्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने दिवगिरीच्या यादवांवर आक्रमण केलं. यादवांचा पराभव झाला हा इतिहास आपल्याला माहिती आहे. खिलजीने इकडे काही सरदार उभे केले. त्यातील एकाने कोंढाण्यावर चाल केली. चाकणला भूईकोट किल्ला बांधला तो खिलजीच्या सरदारांनीच बांधला. त्यांच्यासोबत शेख सलाउद्दीन गाझी हे हजरत होते, सुफी पंथाचे मोठे अनुयायी होते, त्याचा प्रसार भारतात करावा यासाठी ते आले होते. पुण्याजवळ तळ पडला. कसब्यात नदी काठी त्यांनी मुक्काम ठोकला. त्यानंतर काही वर्षांनी सय्यद हिसामुद्दीन झंझाणी नावाचे दुसरे सुफी संत आले आणि दोघांनी आजुबाजूला मुक्काम ठोकला. पुढे शेख सलाउद्दीन यांचा मृत्यू झाला. त्या जागी मजार बांधली गेली. दर्गा नंतर बांधला गेला. 1390 मध्ये सय्यद हिसाबुद्दीन यांचंही निधन झालं. त्यांचीही तिथे मजार बांधली गेली. त्या मोकळा जागा होत्या तिथे त्यांनी मुक्काम ठोकला होता. कालांतराने पुणे नाव मिळालं, लोकवस्ती वाढत गेली. त्यानंतर सत्ता जात येत गेल्या. पुढे शहाजीराजेंचं नाव जे ठेवलं गेलं शहाजी, सरबजी, सरफोजी ही नावं सुफी संतांवरुनच ठेवण्यात आलेली आहेत. कारण त्यांना नवस केला म्हणून. त्यामुळे सुफी संतांवर त्यांचं प्रेम हे होतच. त्यांना कुठे शंका जरी आली असती की मंदिरांच्या जागी दर्गा उभारण्यात आला तर मला वाटत नाही की त्यांनी सहन केलं असतं, असं इतिहास संशोधक डॉ. संजय सोनवणी यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

आनंद दवे यांचं एकत्र येण्याचं आवाहन

पुण्येश्वर मंदिर हे प्राचीन आहे. मात्र याठिकाणी इस्लामी आक्रमणानंतर आधी दर्गा उभारण्यात आला. आता तो दर्गा विस्तृत झाला असून त्याचे मशिदीत रुपांतर झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना त्यासाठी भांडत आहेत. ज्यादिवशी काशी विश्वेश्वरामध्ये महादेवाची पिंड सापडली, त्यादिवशी आम्ही उत्सव साजरा केला. नागेश्वर मंदिरामध्ये हिंदू महासंघाने शपथ घेतली होती, की पुण्येश्वर महादेवाचे मंदिरही आम्ही लवकर मोकळे करू. आता ती वेळ आली आहे. यासंबंधी मनसेने मांडलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे आनंद दवे म्हणाले.

पतित पावन संघटनेचं मत काय?

पुण्यातील पुण्येश्वर तसेच नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिद उभारल्याचा दावा करत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे. यावर पतित पावन संघटनेने टीका करत म्हटले आहे, की या संदर्भातील याचिका ही न्यायप्रविष्ट आहे. आम्हाला न्यायालयात न्याय भेटेल. या संदर्भातील याचिका आधीच दाखल आहे त्यामुळे विषय बाजूला जाऊ नये. तसेच पुण्य ग्रामचा पुण्येश्वर ही पुस्तिकादेखील आम्ही काढली होती, असे पतित पावन संघटनेने म्हटले आहे. संघटनेचे स्वप्नील नाईक यांनी हा विषय राजकीय होत असून यावर टीका केली आहे.