Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करु ते यूपीच्या निवडणूका , पण आठ दिवसांत मुंबई पुरती उरली शिवसेना? 3 बाजू समजून घ्या

| Updated on: Jun 30, 2022 | 10:22 AM

शिवसेनेमधून (shivsena) एकाच वेळी आठ मंत्री आणि 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली आहे. या बंडखोरीनंतर पक्षाने ज्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपावली आहे ते सर्व मुंबईमधीलच आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करु ते यूपीच्या निवडणूका , पण आठ दिवसांत मुंबई पुरती उरली शिवसेना? 3 बाजू समजून घ्या
Image Credit source: ANI
Follow us on

मुंबई : आठ मंत्र्यांसह 40 आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाल्याने शिवसेनेत फूट पडली आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने शिवसेनेचे (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत सर्व अलबेल चालले आहे असेच दिसत होते. शिवसेनेने पक्षविस्ताराचे काम हाती घेतले होते. पक्षाचा राष्ट्रीय स्थरावर विस्तार करण्यासाठी शिवसेनेकडून गोवा आणि उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्यात आले होते. तसेच 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील शिवसेनेकडून तयारी सुरू होती. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात असे वक्तव्य शिवसेनेच्या काही नेत्यांकडून करण्यात येत होते. मात्र आता हे चित्र बदलले आहे. एकाचवेळी आठ मंत्र्यांसह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला राज्यभरात मोठा फटका बसला आहे. आता सध्या शिवसेनेने ज्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, ती सर्व नेतेमंडळी ही मुंबईमधीलच असल्यामुळे शिवसेना मुंबईपुरती मर्यादीत झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेसमोरील आव्हाने

शिवसेनेमधून जे नेते आमदार बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले, ते मराठवाडा, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा राज्याच्या विविध भागातून येतात. त्यांनी त्यांच्या भागात पक्ष संघटन मजबूत करून शिवसेनेला वाढवण्याचे काम केले. ते त्यांच्या मतदार संघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. सामान्य नागरिकांच्या मनात त्यांनी शिवसेना रूजवण्याचे काम केले. मात्र आता त्यांनीच शिवसेना सोडली. या उलट हे आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्याने आता पक्षांनी उर्वरीत नेत्यांकडे पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिले आहेत. त्यामध्ये अनिल परब, सुभाष देसाई, संजय राऊत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, अजय चौधरी यांचा समावेश आहे. मात्र ही सर्व मंडळी मुंबईमधील आहेत. त्यामुळे शिवसेना आता मुंबईपुरती मर्यादीत झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

बंडखोरांशिवाय मोर्चेबांधणी अशक्य?

एक शक्यता अशी देखील वर्तवण्यात येत आहे की, शिवसेनेतून ज्या नेत्यांनी बंडखोरी केली ते राज्याच्या विविध भागातून आले आहेत. त्या प्रदेशाची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे. त्यांनी त्या भागात शिवसेना रूजवण्याचे काम केले. मात्र आता ते पक्षातून फूटले आहेत. सध्या शिवसेनेची जबाबदारी ज्या नेत्यांवर देण्यात आली आहे, त्यातील अनेक जण हे मुंबईमधीलच आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर शिवसेनेची मोर्चेबांधणी करून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी करणं आव्हानात्मक असणार आहे. पुन्हा एकदा पुर्वी सारख्या नेत्यांची फळी तयार करण्यासाठी काही काळ जाऊ शकतो.