‘उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांपैकी मी नाही, भाजपविरोधात लढण्यासाठी शिवसेनेसोबत’, शिवबंधन हाती बांधताच सुषमा अंधारेंचा इशारा

| Updated on: Jul 28, 2022 | 4:17 PM

आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपला इशारा दिलाय.

उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांपैकी मी नाही, भाजपविरोधात लढण्यासाठी शिवसेनेसोबत, शिवबंधन हाती बांधताच सुषमा अंधारेंचा इशारा
सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : शिवसेनेतून 40 आमदार आणि 12 खासदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. अशावेळी पुन्हा एकदा संघटना बाधणीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावलाय. अशावेळी आंबेडकरी चळवळीतील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपला इशारा दिलाय. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत आलो असल्याचं अंधारे यांनी सांगितलं.

हाती शिवबंधन बांधल्यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या की, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. पण मी त्यातील नाही. ठाकरेंवर संकटाची वेळ आलेली असताना भावाच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मला पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही. फक्त देशाचं संविधान वाचवण्यासाठी मला भाजपविरोधात लढाचं आहे. माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही असं जेव्हा उद्धव टाकरे म्हणाले तेव्हाच तळागाळात विचार गेला. त्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलं. माझ्या डोक्यावर ईडीचं ओझं नाही. मी कुठल्या लोभापाई आले नाही. नीलमताई माझ्या पाठीशी आहेत. माझ्याकडून चुकीचं काही होणार नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. त्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत आलो असल्याचं अंधारे यांनी सांगितलं. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग यांचा पाशवी वापर करुन संविधानिक चौकट मोडली जात आहे, असा आरोपही अंधारे यांनी केलाय.

पक्षप्रवेशावेळी अंधारेंना ठाकरेंकडून मोठं गिफ्ट

सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशावेळीच उद्धव ठाकरे यांना त्यांना शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी दिलीय. आगामी काळात ग्रामीण भागातून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली पाहिजे, अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी अंधारे यांच्याकडून व्यक्त केलीय. मी आज सुषमाताईंना एक जबाबदारी देत आहे. मी त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद देत आहे. शिवसेनेसाठी तुम्ही चांगलं काम कराल अशी खात्री आहे. सुषमाताईंसोबत लढणारे सैनिक माझ्यासोबत आले आहेत. नेमक्या लढाईच्यावेळी त्या आमच्यासोबत आल्या आहेत, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

उद्धव ठाकरे म्हणाले की, आता काही लोक नसलेल्या शिवसेनेची पद वाटत आहेत. त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. मी आपल्या खऱ्याखुऱ्या शिवसेनेचं पद वाटत आहे. अनेकांना मी पद आणी जबाबदाऱ्या देत असतो. आता दोन लढाया सुरु आहेत. एक म्हणजे कायद्याची आणि दुसरी जनतेची. ही लढाई, हा निकाल काही फक्त शिवसेनेच्या भवितव्याचा निकाल नाही. तर देशात लोकशाही जिवंत आहे का ते कळेल. जे लोक इकडे वाढले, मोठे झाले, ते आता तिकडे गेले. शिवसेना आणि बाळासाहेबांनी सामान्यातून असामान्य लोक तयार केली. ते आता तिकडे केले. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य नेतृत्व तयार करण्याची वेळी आलीय, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.