शपथ घेताना उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख, मिलिंद नार्वेकर नेमकं काय म्हणाले?
विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

Milind Narvekar MLC Oath Ceremony : महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.
विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला. त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करुन मी शपथ घेतो की मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे, ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार, जय हिंद जय महाराष्ट्र”, असे मिलिंद नार्वेकर शपथ घेताना म्हणाले.
तर भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले. तर भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले. तसेच अमित गोरखे यांनी गळ्यात जय लहूजी असं लिहिलेला एक पट्टा घातला होता. सध्या या सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधी सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
‘या’ आमदारांनी घेतली शपथ
- पंकजा मुंडे – भाजप
- योगेश टिळेकर – भाजप
- अमित गोरखे – भाजप
- परिणय फुके – भाजप
- सदाभाऊ खोत – भाजप
- भावना गवळी – शिंदे शिवसेना
- कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
- शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- प्रज्ञा सातव – काँग्रेस
- मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष