“आमरण उपोषणावेळी शिंदेंनी आश्वासनं दिलं, दिलेला शब्द पूर्ण करा, हीच ती वेळ”, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Jul 30, 2022 | 2:39 PM

Eknath Shinde : संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची विनंती

आमरण उपोषणावेळी शिंदेंनी आश्वासनं दिलं, दिलेला शब्द पूर्ण करा, हीच ती वेळ, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Follow us on

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मराठा तरूणांच्या रोजगारासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात आली आहे. यात त्यांनी मराठा तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न मांडला आहे. अनेक मराठा तरूणांची नोकरीसाठी निवड झाली पण त्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही. त्यांची नियुक्ती होण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे. “शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न झालेल्या मराठा उमेदवारांना त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे, त्याच पदांवर नियुक्ती द्यावी, हा माझ्या आमरण उपोषणाचा एक मुख्य मुद्दा होता. त्यावेळी मंत्री असलेले श्री एकनाथजी शिंदे हे तत्कालीन सरकारचे प्रतिनिधी म्हणून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन घेऊन आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले होते. आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जी आश्वासने दिली होती, ती त्यांनी पूर्ण करावीत. अत्यंत संवेदनशील असणारा नियुक्त्यांचा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने सोडवावा”, अशी फेसबुक पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिली आहे.

संभाजीराजेंचं आमरण उपोषण

संभाजी छत्रपती यांनी काही मागण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी हे उपोषण केलं होतं. सरकारच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील आणि अमित देशमुख यांनी संभाजी छत्रपती यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी आश्वासन दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. एवढेच नव्हे तर संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्यांमध्ये आम्ही त्यात आणखी मागण्यांची भर घालून त्या पूर्ण केल्या आहेत, असं एकनाथ शिंदे तेव्हा म्हणाले होते. यानंतर संभाजी छत्रपती आणि त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी उपोषण सोडलं. तेव्हा दिलेलं आश्वासन पूर्ण व्हावं, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

संभाजीराजेंचं आमरण उपोषण कशासाठी?

  1. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अपेक्षित न्या. दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुद्दे आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक निर्णय शाससाने गांभिर्याने घेऊन पुढील कारवाई सुरु करावी.
  2. मराठा आरक्षण मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. मात्र, तोपर्यंतच्या काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी माझा हा लढा आहे.
  3. ESBC आणि SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.
  4. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारखी संस्थेचे सक्षमीकरण करावे. येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.
  5. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा वाढवावी भरिव आर्थिक निधीची तरतुद करुन महामंडळाकडे पैसे वर्ग करावेत. सध्या या महामंडळाला पूर्णवेळ कार्यकारी संचालक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे संचालक मंडळ नेमणे आवश्यक आहे.
  6. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह तात्काळ सुरु करावे.
  7. कोपर्डी खून खटल्याची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी शासनाने पाठपुरावा करुन आरोपींना फाशी होण्यासाठी आग्रही रहावे.
  8. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा आश्वासनाची पूर्तता करावी.
  9. आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयात झालेल्या मालमत्तेचे नुकसान भरपाईबाबत उल्लेख आहे. त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे ते गुन्हे मागे घ्यावेत. आता नव्याने मुंबई पोलिसांनी 2017 मध्ये निघालेल्या बाईक रॅलीत सहभागी सर्वांवर नोटीसा काढलेल्या आहेत. ते देखील रद्द करावेत.