येथे नवरात्रीतही देवतेला अर्पिला जातो मांसाहारी नैवेद्य, भारतातील या ७ प्रसिद्ध मंदिरांची अनोखी परंपरा नेमकी काय?
नवरात्रीमध्ये सर्वत्र सात्विक अन्न आणि पूजेला महत्त्व असते. मात्र, भारतात अशी काही शक्तीपीठे आणि पवित्र मंदिरे आहेत,जेथे देवतेला मासे आणि बकऱ्याचे मांस अर्पण करण्याची प्राचीन पाळली जाते.

देशभरात शारदीय नवरात्रोत्सव भक्तीभावाने साजरा होत आहे.देवींच्या या उत्सवादरम्यान उपवास आणि सात्विक आहार केला जातो. बहुतेक भक्त कांदा, लसूण आणि तामसिक पदार्थांचे सेवन कटाक्षाने टाळतात आणि मंदिरांमध्येही देवीला शुद्ध सात्विक नैवैद्य अर्पण केले जाते. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की आपल्या देशात अशी काही प्रसिद्ध शक्तीपीठे आणि मंदिरे स्थळे आहेत, जेथे देवीला मांसाहारी भोजन अर्पण करण्याची परंपरा आहे? चला, अशा ७ पवित्र मंदिरांबद्दल जाणून घेऊया
विमला मंदिर (पुरी, ओडिशा) – ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर संकुलात असलेले विमला मंदिर हे एक अत्यंत महत्त्वाचे शक्तीपीठ आहे. येथे दुर्गापूजेला विशेष विधी केला जातो.या विधीत सूर्योदयापूर्वी एका बकऱ्याचा बळी दिला जातो. यासोबतच, पवित्र मार्कंडेय तलावातून आणलेला मासा शिजवून देवी विमलाला अर्पण केला जातो. या विधीला ‘विमला पुरुष’ म्हटले जाते आणि पूजेसाठी उपस्थित असलेल्या भक्तांना हे मांस प्रसाद म्हणून वाटले जाते.
तारकुल्हा देवी मंदिर (गोरखपूर, उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या तरकुल्हा देवी मंदिरातही देवीला मांसाहारी नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. येथे नवरात्रीदरम्यान, विशेषतः चैत्र रामनवमीच्या आसपास, देवीला प्रसन्न करण्यासाठी बकऱ्याचा बळी दिला जातो. बळी दिल्यानंतर, बकऱ्याचे मांस शिजवून भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जाते.
पारासिनीक्कडवू मंदिर (केरळ) – केरळातील या मंदिरात भगवान मुथप्पन यांना भाजलेले मासे आणि ताडी अर्पण करण्याची एक अनोखी परंपरा आहे. पूजा पूर्ण झाल्यावर, हे नैवेद्य पवित्र प्रसाद म्हणून भक्तांना वाटले जाते.
मुनियांडी स्वामी मंदिर – तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्याजवळील वडक्कमपट्टी येथे वार्षिक मंदिर उत्सवादरम्यान गावात २,००० किलोग्रॅम बिर्याणी तयार करून ‘प्रसाद’ म्हणून वाटली जाते. स्थानिक रहिवाशांचा असा विश्वास आहे की बिर्याणी हे भगवान मुनियांडी यांचे आवडते भोजन आहे.
कामाख्या मंदिर (आसाम) – आसाममधील कामाख्या मंदिर हे देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हे मंदिर शक्ती उपासना आणि तांत्रिक साधनेचे प्रमुख केंद्र आहे. येथे शाकाहारी नैवेद्यासोबतच बकऱ्याचे आणि माशाचे मांसही अर्पण केले जाते. मात्र, हा प्रसाद तयार करताना लसूण किंवा कांद्याचा वापर केला जात नाही.
तारापीठ मंदिर (पश्चिम बंगाल)- पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील तारापीठ, हे माता ताराचे एक अत्यंत प्रसिद्ध शक्तीपीठ आहे. हे मंदिर तांत्रिक परंपरांशी जवळून संबंधित आहे. येथे माता ताराला मटण आणि मासे अर्पण केले जातात, तसेच शिजवलेले बकऱ्याचे मांस आणि ‘शोल’ मासे अर्पण करण्याची एक विशेष परंपरा आहे.
कालीघाट मंदिर (पश्चिम बंगाल) – कोलकाता येथील कालीघाट मंदिर हे देखील ५१ शक्तीपीठांपैकी एक पवित्र स्थान आहे. येथेही आपले नवस पूर्ण केल्यानंतर भक्त मंदिरात देवीला एका बकऱ्याचा बळी देतात आणि नंतर ते मांस नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते आणि प्रसाद म्हणून वाटले जाते.