तुमचा जोडीदार खूपच जिद्दी आहे, तुमचं काहीच ऐकत नाही? मग हे चार नियम नेहमी लक्षात ठेवा

नातं टिकवायचं असेल तर प्रेमासोबत या 4 गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत. सुधा मूर्ती यांनी दिला नातं मजबूत करण्याचा कानमंत्र. प्रत्येक जोडीदाराने हा नियम पाळल्यास नातं होते अधिक घट्ट.

तुमचा जोडीदार खूपच जिद्दी आहे, तुमचं काहीच ऐकत नाही? मग हे चार नियम नेहमी लक्षात ठेवा
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 16, 2026 | 6:56 PM

सध्याच्या धावपळीच्या जीवनात नाती टिकवणे हे मोठे आव्हान बनले आहे. पती-पत्नी किंवा जोडीदारामध्ये मतभेद आणि कुरबुरी होणे स्वाभाविक असले तरी एकमेकांना समजून घेणे, आदर देणे आणि संवाद साधणे नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या विचारांनुसार, नातं मजबूत ठेवण्यासाठी केवळ प्रेम पुरेसे नसून त्यासाठी दोघांमधील परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि आदरही आवश्यक आहे.

1. एकमेकांशी स्पर्धा करू नका

Loading...

प्रत्येक व्यक्तीचे गुण आणि क्षमता वेगवेगळ्या असतात. त्यामुळे नात्यांमध्ये जोडीदारापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एकमेकांच्या गुणांचा आदर करावा. मत्सर आणि अहंकार टाळून एकमेकांना साथ दिल्यास नात्यातील विश्वास वाढतो.

2. एकमेकांना वैयक्तिक अवकाश द्या

नात्यात प्रत्येकाला स्वतःच्या आवडीनिवडी, छंद आणि मित्रमैत्रिणींसाठी वेळ हवा असतो. जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करण्याऐवजी त्याला स्वातंत्र्य द्यावे. यामुळे नात्यात घुसमट निर्माण होत नाही आणि परस्पर आदर टिकून राहतो. तसेच नाते देखील खूप दिवस टिकून राहते.

3. जोडीदाराचे चांगले मित्र बना

मजबूत नात्याचा पाया मैत्रीमध्ये असतो. त्यामुळे नात्यात एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणे, भावना समजून घेणे आणि कठीण प्रसंगी साथ देणे हे खूप आवश्यक आहे. एकत्र वेळ घालवल्याने आणि संवाद वाढवल्याने नात्यातील जवळीक अधिक घट्ट होते.

4. तक्रारींपेक्षा कौतुकाला महत्त्व द्या

नातं जपायचे असेल तर जोडीदाराच्या चुका सतत दाखवण्याऐवजी त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करावे. छोट्या प्रयत्नांची दखल घेतल्याने समोरच्या व्यक्तीला आनंद मिळतो आणि नात्यात सकारात्मकता वाढते. सततच्या तक्रारी टाळून प्रेमाने संवाद साधल्यास गैरसमजही कमी होऊ शकतात.

नातं टिकवण्याचा साधा मंत्र

नात्यात प्रेमासोबत विश्वास, आदर, मैत्री आणि समजूतदारपणा असणे खूप गरजेचे आहे. एकमेकांना बदलण्याचा आग्रह धरण्याऐवजी एकमेकांना स्वीकारणे आणि अडचणीच्या काळात दोघांनी एकमेकांना साथ देणे, यामुळे दोघांमधील नातं अधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे वरील चार नियम प्रत्येक जोडीदाराने अमलात आणल्यास नाते अधिक घट्ट होऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us