जगातील ‘ओम’ आकाराचं सर्वात पहिलं मंदिर… आध्यात्म, भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध

जगातील 'ओम' आकाराचं सर्वात मोठं मंदिर हे राजस्थान येथे आहे. हे मंदिर आध्यात्म आणि वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात अनेक भक्त दर्शनासाठी जात असतात. तर जाणून घ्या हे मंदिर खास का आहे.

जगातील ओम आकाराचं सर्वात पहिलं मंदिर... आध्यात्म, भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध
| Updated on: Aug 31, 2026 | 3:37 PM

भक्तांसाठी मंदिर हे महत्त्वाचं स्थान आहे. जगात अनेक मंदिर आहेत. पण ‘ओम’ आकाराचा जगात एकच मंदिर आहे. हे मंदिर कुठे आहे असा प्रश्न आता तुम्हाला देखील पडला असेल, हे मंदिर राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जादन गाव येथे असून, ते आध्यात्मिकतेसाठी आणि भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेले ओम आकाराचं मंदिर हे जगातील पहिले मंदिर मानलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, ओमच्या आकाराचं हे मंदिर सुमारे 250 एकर परिसरात बांधण्यात आलं आहे.

मंदिराच्या वास्तुकलेत पारंपरिक नागर वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो. भक्ती, वास्तुकला आणि अभियांत्रिकी कौशल्याचा संगम वाटणारं हे मंदिर पर्यटकांना प्रभावित करतं. हे मंदिर सुमारे 3 हजार सुंदर कोरीव स्तंभांवर उभारलं आहे. मंदिराची मुख्य रचना सुमारे 135 फूट उंच आहे. मंदिराच्या शिखरावर असलेलं दुर्मिळ दगडाचं शिवलिंग हे एक विशेष आकर्षण आहे.

असं देखील म्हटलं जातं की, मंदिराच्या परिसरात भगवान शिवाच्या एकूण 1 हजार 8 मूर्ती आहेत. यामध्ये देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींचा समावेश आहे. मंदिर संकुलात 108 खोल्या देखील आहेत. हिंदू परंपरेत 108 या संख्येला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. जप माळेत देखली 108 मणी असतात. मंदिराखाली बांधलेलं कृत्रिम तलावदेखील या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतें.

या मंदिराची उभारणी ही विश्वगुरू महा मंडलेश्वर परमहंस स्वामी महेश्वरानंद पुरीजी महाराज यांची दूरदृष्टी आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ओम आश्रमाचं मुख्य उद्देश भक्तांनी ध्यान करावं, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करावं आणि ‘ओम’ या वैश्विक नादाशी एकरूप व्हावेत हे आहेत. गुरु माधवानंदजींची समाधीदेखील मंदिराच्या मध्यभागी आहे.

असं देखील सांगितलं जातं की, या मंदिराच्या बांधकामास 1995 मध्ये सुरुवात झाली. अनेक वर्षांच्या बांधकामानंतर, हे ठिकाण भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करणारे एक लोकप्रिय आध्यात्मिक केंद्र बनलं आहे. भक्त मंदिरात दर्शनासीठी सकाळी 6 ते दुपारी 12, त्यानंतर दुपारी 2 ते रात्री 8 च्या वेळेत दर्शन घेऊ शकता. ‘ओम’ आकाराचे हे मंदिर केवळ एक मंदिर नाही. ते भारतीय अध्यात्म, वास्तुकला, पवित्र भूमिती आणि भक्ती संकल्पना यांचे एकत्रीकरण आहे.

Follow Us