अखेर जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासनाला मिळाला जमीन विक्रीचा अधिकार; जाणून घ्या काय आहे मंदिराचा इतिहास

| Updated on: Jan 07, 2022 | 9:27 PM

प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या नियमांमध्ये आता बदल झाले आहेत. यामुळे मंदिराची जमीन विकण्याचा अधिकार मंदिर प्रशासनाला मिळाला आहे. यासोबतच या मंदिराशी संबंधित अशी काही रहस्य आहेत जी तुम्हाला चकित करून सोडतील. या मंदिराची सावली, इथली भांडी आणि मंदिराच्या झेंड्याची कथा रहस्य कथेप्रमाणेच वाटेल.

अखेर जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासनाला मिळाला जमीन विक्रीचा अधिकार; जाणून घ्या काय आहे मंदिराचा इतिहास
Follow us on

पुरी:  होय विश्व प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिर प्रशासनाला मंदिराची जमीन विकण्याचा अधिकार मिळाला आहे. मंदिर प्रशासनाच्या कायद्यात बदल झाल्याने हे मंदिर पुन्हा चर्चेत आले आहे. ओरिसा कँबिनेटने  जगन्नाथ मंदिर अधिनियम 1954 मध्ये झालेल्या संशोधन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या अधिनियमातील संशोधनानंतर मंदिर व्यवस्थापनाला जगन्नाथ पुरी मंदिर कमेटीच्या अधिनस्थ असलेली जमीन आणि अन्य अचल संपत्तीची ( real estate) विक्री किंवा भाडेतत्वावर देण्याचा अधिकार मिळाला आहे.  या निर्णयाने मंदिरातील विवादित जमिनीमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण पूर्वीचे नियम काय होते. याविषयी सर्वसामान्यांना फारशी माहिती नाही. कोणत्या परिस्थितीत मंदिराच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले याविषयी माहिती आम्ही देणारच आहोत. यासोबतच या मंदिराशी संबंधित कथा, पद्धती, परंपरा ऐकाल तर अजून चकित व्हाल. या मंदिराचा इतिहास आणि पुजाविधी रहस्यकथे प्रमाणेच आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार पूर्वी जगन्नाथ मंदिर अधिनियम 1954 च्या 16 -2 कलम नुसार श्रीजगन्नाथ मंदिराच्या अचल संपत्तीला विकताना  किंवा भाडेतत्त्वावर देताना, गहाण ठेवताना  मालकी हक्क स्थानांतरणासाठी सरकारची परवानगी आवश्यक होती. या नियमात बदल केल्याने आता सरकारच्या परवानगीशिवाय जमिनीची विक्री करता येणार आहे.  एका रिपोर्टनुसार भगवान जगन्नाथांच्या नावावर 60, 426 एकर जमीन आहे. ओरिसातील 24 जिल्ह्यांमध्ये ही जमीन आहे. सोबतच 395 एकर जमीन पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये आहे. नव्या नियमानुसार आता या अचल संपत्तीवर मंदिर प्रशासनाचा थेट अधिकार निर्माण झाला आहे.

मंदिराचा इतिहास

पुरी जगन्नाथ मंदिर वैष्णव परंपरेचे मुख्य क्षेत्र आहे. इथे दररोज हजारो भाविक येतात. तसे तर हे मंदिर विष्णूला समर्पित आहे. विष्णूलाच जगन्नाथ या नावाने ओळखले जाते.विष्णूसोबतच बलराम ( बलभद्र) आणि त्यांची बहीण सुभद्रा यांचीही पुजा इथे होते. मंदिराच्या गर्भगृहात भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडाच्या मूर्ती आहेत. प्रत्येक 12 वर्षांनंतर या मुर्ती बदलल्या जातात. हा विधी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

कशी होते पुजा ?

इंडियन कल्चर या सरकारी वेबसाईटनुसार इथे भगवंताची पुजा अत्यंत वेगळ्या पद्धतीने केली जाते. कुटुंबातील सदस्याप्रमाणेच देवाची काळजी घेतल्या जाते. दररोज सकाळी संगीत आणि आरतीच्या गजरात देवाला जागे केले जाते. देवाने रात्री झोपताना घातलेले वस्त्र बदलले जातात. त्यांचे दात घासून नंतर स्नान करून त्यांना नवे वस्त्र नेसवूनच सकाळच्या दर्शनासाठी देवाला तयार केले जाते. यानंतर पुन्हा वस्त्र बदलून त्यांना जेवण दिले जाते. यामध्ये फळ, दही आणि नारळ असते. यानंतर दुसरा नाश्ता ( राज भोग) दिला जातो. यामध्ये सुपारीचा समावेश असतो. एक वाजता देवांना दुपारचे जेवण ( मध्यान्ह धूप) दिले जाते. यानंतर देव आराम करतात. यासाठी गर्भगृहात खास व्यवस्था असते. इथे खाट टाकून देवाला शांतपणे झोपू दिले जाते. संध्याकाळी 6 वाजता पुन्हा अल्पोपहार आणि दर्शनासाठी देवाला जागे केले जाते. यानंतर त्यांना लगेच चंदनलागी म्हणजे देवाच्या देहाला चंदनाचा लेप लावून पुन्हा नवी वस्त्र घातली जातात आणि देव सायंकाळसाठी तयार होतात. देव पुन्हा रात्री 10.30 वाजता भोजन ( बडाश्रृंगार भोग) करतात. त्यांना पुन्हा झोपण्यासाठी खाटा हटवून उबदार गाद्या- पलंग टाकले जातात. मंदिराचे सेवक वीणेच्या ध्वनीवर कवी जयदेव रचित गीत गोविंदाचे गीत ऐकवतात. यानंतर देव सकाळपर्यंत विश्रांती घेतात.

जगन्नाथ पुरी मंदिराच्या प्रचलित कथा

असे म्हणतात की, भगवान जगन्नाथ मंदिराची रचना कलिंग शैलीतील आहे. मंदिर अत्यंत सुंदर आहे. विशेष म्हणजे  दिवसा या मंदिराची सावली पडत नाही. काही लोकांच्या मते हे मंदिर बांधण्याची कला आणि तर काहींच्या मते भगवान जगन्नाथ यांचा चमत्कार आहे. मंदिराच्या वर फडकणारा ध्वज (झेंडा) नेहमी हवेच्या विरूद्ध दिशेने फडकतो. दररोज एक पुजारी वर चढून झेंडा बदलतो. कित्येक वर्षांपासून ही परंपरा कायम असून आजवर कधीही परंपरा थांबली नाही. भगवान जगन्नाथ यांच्यासाठी तयार होणारा भोगसाठी ( महाप्रसाद) विशिष्ट भांडी वापरली जातात. हे भांडे पुन्हा वापरले जात नाही. हा प्रसाद इथे दररोज येणाऱ्या हजारो भक्तांना दिला जातो. आजवर हा प्रसाद कधी कमी पडला नाही की कधी उरला नाही. या परंपरांसह प्रसाद तयार करण्याचा विधी देखील विशेष आहे.  मंदिराच्या या पवित्र स्वयंपाकघरात देवाचा संपूर्ण प्रसाद मातीच्या भांड्यात तयार होतो. एकावर एक अशी सात भांडी ठेवून अन्न शिजवल्या जाते.

संबंधित बातम्या

Lord Vishnu Famous Temple : देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली रहस्यमयी, अद्भूत, मनमोहक अशी भगवान विष्णूची मंदिरे, फोटो पाहून मंत्रमुग्ध व्हाल

पितृदोषाच्या प्रकोपाचा सामना करताय, मग हे उपाय करा, मिळेल सर्व संकटांपासून मुक्ती

Sphatik Mala | स्फटिक माळेचे जादूई उपयोग तुम्हाला माहीत आहेत का ? आजच वापरुन पाहा