SRH vs MI : मलिंगाने हार्दिकला केलं इग्नोर, कॅप्टनवर सर्वच नाखूश? व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Mar 28, 2024 | 4:59 PM

Lasith Malinga Hardik Pandya Video : हार्दिक पंड्याचे दिवस फिरलेत असंच एकूण सध्याची परिस्थिती आहे. हार्दिकला आधीच रोहित चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागतोय. त्यात आता लसिथ मलिंगा हार्दिकवर नाराज असल्याचं एका व्हायरल व्हीडिओमुळे म्हटलं जात आहे.

SRH vs MI : मलिंगाने हार्दिकला केलं इग्नोर, कॅप्टनवर सर्वच नाखूश?  व्हीडिओ व्हायरल
Follow us on

टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल होतोय. हार्दिकच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. रोहित शर्मा याला हटवून हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केलं. मुंबई फ्रँचायजीच्या निर्णयाचा संताप चाहते हार्दिकवर जाहीर करत आहेत. त्यात हार्दिकने आयपीएल 17 व्या हंगामातील मुंबईच्या पहिल्या सामन्यात रोहितला दिलेल्या वागणुकीचा रागही चाहत्यांच्या मनात आहे. मुंबईला हार्दिकच्या नेतृत्वात सलग 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे हार्दिकवर चौफेर टीका होत आहे. अशात हार्दिक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिक, लसिथ मलिंगा आणि किरॉन पोलार्ड या तिघांचा हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यानचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हीडिओत लसिथ मलिंगा आणि पोलार्ड खुर्चीवर आजूबाजूला बसले आहेत. तेवढ्यात हार्दिक पंड्या या दोघांजवळ येतो. हार्दिकला बहुतेक खुर्ची पाहिजे असं हा व्हीडिओ पाहून वाटतं. त्यामुळे आधी पोलार्ड हार्दिककडे रोखून पाहतो. पोलार्ड खुर्ची सोडतोय हे पाहून लसिथ मलिंगा त्याला रोखतो आणि न पाहता थेट खुर्ची सोडून निघून जातो. त्यानंतर मलिंगाच्या खुर्चीवर हार्दिक पंड्या बसतो. आता या दरम्यान पोलार्ड, पंड्या आणि मलिंगा या तिघांमध्ये काय बोलणं झालं हे समजलं नाही. मात्र पोलार्डचं पंड्याकडे रोखून पाहणं. त्यानंतर मलिंगाने न पाहता थेट निघून जाणं हे काय नेटकऱ्यांना पटलेलं नाही. त्यामुळे मुंबईच्या गोटात हार्दिक कॅप्टन झाल्यानंतर नाराजीचं वातावरण आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

नेटकरी व्हीडिओबाबत काय म्हणतायेत?

हार्दिकचं आपल्या वरिष्ठांसह वागणूक बरोबर नाही. त्याने आपल्या वरिष्ठांसह सन्मानाने वागायलं हवं, असं काही नेटकऱ्यांचं मत आहे. तर मी कॅप्टन आहे. मी आल्यावर मला खुर्ची द्यायला हवी, हार्दिकचा असा रुबाब या व्हीडिओतून दिसून येत असल्याचंही नेटकऱ्यांना वाटतंय.

लसिथ मलिंगा हार्दिकवर नाराज?

दरम्यान मुंबईला आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपल्या पहिल्या 2 सामन्यात पराभवाने सुरुवात करावी लागली आहे. गुजरात टायटन्सने पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात 27 मार्च रोजी हैदराबादने 31 धावांनी मात केली. त्यामुळे नेतृत्वासह वागणुकीपर्यंत हार्दिकवर प्रत्येक बाबतीत टीका केली जात आहे.