IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपची लढत झाली चुरशीची, विराट कोलकात्याविरुद्ध फेल झाला आणि…

| Updated on: Apr 21, 2024 | 11:11 PM

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : आयपीएल 2024 स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यानंतरही विराट कोहलीची ऑरेंज कॅप कायम आहे. पण कमी धावांवर बाद झाल्याने चुरस वाढली आहे.

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपची लढत झाली चुरशीची, विराट कोलकात्याविरुद्ध फेल झाला आणि...
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत आता प्लेऑफची चुरस वाढत चालली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अवघ्या एका धावेने पराभूत केलं आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं प्लेऑफचं स्थान जवळपास भंगलं आहे. गणिती भाषेत एखादा चमत्कार घडला तर शक्य होऊ शकतं. पण तसं होणं सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे जवळपास 99 टक्के रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. फक्त एक टक्काच चमत्काराच्या अपेक्षा आहेत.  असं असलं तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु स्टार फलंदाज विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप कायम आहे. अजून काही सामने ही कॅप डोक्यावर कायम राहील असंच दिसत आहे. विराट कोहलीने कोलकात्या विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात 7 चेंडूत 18 धावा केल्या. यात 1 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यामुळे त्याच्या धावसंख्येत 18 धावांनी भर पडली. त्यामुळे ऑरेंज कॅपचा मान त्यालाच मिळाला आहे.

विराट कोहलीने 8 सामन्यात 2 अर्धशतकं आणि एक शतकी खेळीच्या जोरावर 379 धावा केल्या आहेत. त्या खालोखाल सनरायझर्स हैदराबादचा ट्रेव्हिस हेड आहे. त्याने 6 सामन्यात 2 अर्धशतकं आणि एका शतकाच्या जोरावर 324 धावा केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ट्रेव्हिस हेड अव्वल स्थानी पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. त्याने 7 सामन्यात 3 अर्धशतकांच्या जोरावर 318 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. त्याने 7 सामन्यात
एका शतकी खेळीच्या जोरावर 297 धावा केल्या. पाचव्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरीन असून त्याने 7 सामन्यात 286 धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.

रविवारी डबल हेडर सामन्यांची मेजवानी क्रीडारसिकांना मिळाली. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात कोलकात्याने 20 षटकात 6 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 20 षटकात सर्व गडी बाद 221 धावा करता आल्या. अवघ्या एका धावेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सामना गमवावा लागला. दुसरीकडे, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. गुजरातने उत्तम गोलंदाजी करत पंजाबला 142 धावांवर रोखलं. तसेच विजयासाठी मिळालेलं 143 धावांचं सोपं आव्हान 7 गडी गमवून पूर्ण केलं.