
सिडनी: ‘करो या मरो’ मॅचमध्ये पाकिस्तानने खेळाचा स्तर उंचावला आहे. सिडनीमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना सुरु आहे. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानला आजच्या सामन्यात विजय आवश्यक आहे. पाकिस्तानसाठी सेमीफायनलची वाट बिकट आहे. त्यामुळे त्यांना काहीही करुन आज मॅच जिंकावीच लागणार आहे. अन्यथा त्यांच आव्हान संपुष्टात येऊ शकते.
पाकिस्तानची सुरुवात खराब झाली
आजच्या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने आपल्या फलंदाजीचा स्तर उंचावला आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली होती. मोहम्मद रिझवानच्या रुपाने 4 रन्सवर त्यांना पहिला झटका बसला. डावखुरा वेगवान गोलंदाज पार्नेलने रिझवानला 4 रन्सवर बोल्ड केलं.
बाबर आजमचा फ्लॉप शो
कॅप्टन बाबर आजमचा फ्लॉप शो या मॅचमध्येही कायम राहिला. त्याने 15 चेंडूत फक्त 6 रन्स केल्या. निगीडीने त्याला रबाडाकरवी झेलबाद केलं. दोन्ही सलामीवीर 38 धावात तंबूत परतले.
100 धावा पूर्ण होण्याआधीच निम्मा संघ तंबूत
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मोहम्मद हॅरिसने आक्रमक बॅटिंग केली. त्याने 11 चेंडूत 28 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 3 षटकार होते. टीमच्या 100 धावा पूर्ण होण्याधीच पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला होता.
त्या दोघांची जबरदस्त बॅटिंग
लोअर ऑर्डरमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमदने जबरदस्त बॅटिंग केली. इफ्तिखारने 35 चेंडूत 51 तर शादाबने 22 चेंडूत 52 धावा चोपल्या. इफ्तिखारने 3 चौकार आणि 2 षटकार मारले, शादाब खानने 3 चौकार आणि 4 षटकार लगावले. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 षटकात 9 बाद 185 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 186 धावांच मोठं लक्ष्य ठेवलं आहे.