मुंबई इंडियन्स हैदराबाद सामन्यात स्विगी-झोमॅटोने घेतली फिरकी, अशा पद्धतीने केलं ट्वीट

| Updated on: Mar 28, 2024 | 5:12 PM

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या वाटेला नकोसा पराभव आला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सला 31 धावांनी पराभूत केलं आहे. मुंबई इंडियन्सच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे.

मुंबई इंडियन्स हैदराबाद सामन्यात स्विगी-झोमॅटोने घेतली फिरकी, अशा पद्धतीने केलं ट्वीट
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याचा कस लागणार आहे. सुरुवातीचे दोन सामने गमवल्याने आता पुढील प्रवास कठीण होत जाणार आहे. त्यात हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरही बोट ठेवलं जाणार आहे. सनरायझर्स हैदराबादकडून मिळालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सी प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. माजी खेळाडूंनी जसप्रीत बुमराहचा वापर व्यवस्थितरित्या करत नसल्याचा ठपका ठेवला आहे. बुमराहने पहिल्या 13 षटकात फक्त एक षटक टाकलं होतं. यावरून सोशल मीडियावर हार्दिक पांड्याविरोधात रान उठलं आहे. जसप्रीत बुमराहला षटक न दिल्याने मोठी धावसंख्या उभी राहिली असा ठपका ठेवला आहे. आता नेटकरी मीम्सच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत. तर स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यानीही मुंबई इंडियन्सच्या पराभवाची फिरकी घेतली आहे. स्विगी आणि झोमॅटोने केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

“मुंबईने टॉसवेळी हेड मागितला आणि डाव सुरु होताच हेडेक सुरु झाला.”, असं ट्वीट स्विगीने केलं असून हॅशटॅग मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असं केलं आहे. तर झोमॅटोनेही मजेशीर ट्वीट करत लिहिलं की, “माफ करा मुंबई, या टार्गेटवर तुम्हाला आमच्या एपवरून काहीही सूट मिळणार नाही.”

सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावा केल्या. आयपीएल इतिहासातील हा सर्वात मोठा स्कोअर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 11 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. आतापर्यंत या सामन्यात जवळपास 10 नवे विक्रम रचले गेले आहेत. संघाच्या 277 धावा, एकूण 38 षटकार, दोन्ही संघांच्या मिळून 523 धावा, तसेच दुसऱ्या डावात 246 धावा असे काही विक्रम नोंदवले गेले. यानंतर आता सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 1 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 7 एप्रिल, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 11 एप्रिल आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 14 एप्रिलला सामना होणार आहे. हे चारही सामने मुंबईत होणार असल्याने होमग्राउंडचा फायदा मिळू शकतो. सध्या मुंबई इंडियन्स गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. 31 धावांच्या पराभवामुळे रनरेटवर फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी पुढील सामने चांगल्या मार्जिनने जिंकावे लागतील.