Hardik Pandya: हार्दिक पंड्याचा पुन्हा पत्ता कट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेत मराठमोळ्या मुंबईकर खेळाडूची टीममध्ये एन्ट्री
Hardik Pandya News: हार्दिक पंड्या काही लवकर कमबॅक करेल अशी चिन्हे फार कमी दिसत आहे. कारण तो पुन्हा एकदा एका मालिकेतून बाहेर पडला आहे.

Hardik Pandya Injuries: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागील काही काळापासू दुखापतीशी झुंज देत आहे. तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे, हार्दिकचा पत्ता पुन्हा कट झाला आहे. हार्दिकला आता मुंबईकर खेळाडूने रिप्लेस केले आहे. हार्दिक सतत दुखापतीचा सामना करत असल्यामुळे त्याचा कमबॅक काही लवकर होणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत.
मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगेने भारत ‘अ’ संघात या दुखापतग्रस्त भारतीय अष्टपैलू खेळाडूची जागा घेतली आहे. संघ मंगळवारपासून पुदुचेरी येथे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एका सूत्राने सांगितले की, शेडगेने तंदुरुस्ती चाचणीसाठी बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सला (CoE) भेट दिली आणि CoE च्या वैद्यकीय पथकाकडून परवानगी मिळाल्यानंतर तो काल पुदुचेरीसाठी रवाना झाला. हे सामने ६, ९ आणि ११ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. वृत्तानुसार, हार्दिक पांड्याला त्याच्या उजव्या पोटरीमध्ये अजूनही दुखापत होत आहे.
सूर्यांश शेडगे ११ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडियमवर चंदीगडविरुद्ध होणाऱ्या मुंबईच्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्याला मुकणार आहे. शेडगेने जून-जुलैमध्ये आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वेच्या दौऱ्यांमध्ये भारतासाठी तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. दुखापतीमुळे त्याला भारत आणि ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघात स्थान मिळू शकले नाही. पण आता तो तंदुरस्त असल्यामुळे त्याला थेट भारतीय अ संघात स्थान मिळाले आहे. जूनमध्ये श्रीलंकेत झालेल्या त्रिकोणीय मालिकेत शेडगेने ‘इंडिया ए’ संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली होती. मधल्या फळीत फलंदाजी करताना, या २३ वर्षीय खेळाडूने पाच सामन्यांमध्ये १४७ धावा केल्या आणि संपूर्ण स्पर्धेत २३ षटके गोलंदाजी करून गोलंदाजीतही योगदान दिले. २०२४-२५ मध्ये मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजयातही तो एक महत्त्वाचा खेळाडू होता; त्याने खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करताना २५१.९२ च्या स्ट्राईक रेटने १३१ धावा केल्या.
आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्जकडून खेळतो. श्रेयस अय्यर आणि त्याची मैत्री ही खूप जुनी आहे. त्या दोघांनी मुंबईसाठी अनेक सामने खेळले आहेत. सूर्यांशला पंजाबमध्ये सामील करुन घेण्यासाठी आणि भारतीय संघात पदार्पण देण्यामागे हा श्रेयसचा हात असल्याचे म्हटले जात आहे.