IND vs WI: माझ्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये, मी मानसिकदृष्टया… मॅचनंतर तिलक वर्मा असं का म्हणाला?
Tilak Vrma On Team India Combination: वेस्ट इंडिजविरुद्ध पाचवा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर तिलक वर्माने अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.

IND vs WI 5th T20 Match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. या मालिकेतील पाचवा सामना पावसामुळे अर्ध्यातूनच रद्द करावा लागला. मालिका २-२ बरोबरीत सुटली. भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजीही या मालिकेत उत्कृष्ट पाहायला मिळाली नाही. मॅचनंतर उपकर्णधार तिलक वर्माने काही गोष्टींवर भाष्य केले आहे.
भारतीय टी-२० संघाचा उपकर्णधार तिलक वर्माने कबूल केले की, फलंदाजीच्या क्रमात तिसऱ्या क्रमांकावरून पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येणे सोपे नाही, पण मला विश्वास आहे की आपले कौशल्य सुधारून आणि मानसिक तयारी करून मी या नवीन भूमिकेतील आव्हानांना सामोरे जाईल. एक फलंदाज म्हणून, माझ्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळणे सोपे असेल.” पण सध्या तरी, आमच्या संघाच्या अव्वल फळीतील फलंदाजांची रचना पाहता, मला पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल.
“इशान आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे आणि तिथे तो उत्कृष्ट कामगिरी करत आहे. अशा परिस्थितीत, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करून संघासाठी माझी भूमिका बजावण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी या भूमिकेसाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये, या स्थानावर खेळताना मी संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे, मला विश्वास आहे की मी या भूमिकेतही चांगली कामगिरी करेन.” असं तिलक म्हणाला.
“मला जुळवून घ्यावं लागेल नाहीतर ते अवघड होईल. जेव्हा तुम्ही फिनिशर असता आणि चेंडू हळू गतीने येतो, तेव्हा तुम्हाला त्यावर षटकार मारता आले पाहिजेत. टी-२० मध्ये पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास अनेकदा फक्त पाच ते सहा षटकेच होतात, मी माझ्या खेळात बदल केले आहेत. लहानपणी मी या भूमिकेत खेळलो आहे. माझ्यात मैदानाच्या सर्व बाजूंनी फटके मारण्याची क्षमता आहे. मला विश्वास आहे की मी तिसऱ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास जुळवून घेऊ शकेन. एक-दोन दिवसांच्या सरावानंतर, संघाला आवश्यक असलेली कोणतीही भूमिका मी बजावू शकेन” असं तिलकने कबूल केले.