Asia Cup Hockey 2022: हॉकी संघाची दमदार कामगिरी, जपानला धक्का देत भारताने जिंकलं ब्राँझ मेडल

| Updated on: Jun 01, 2022 | 4:34 PM

Asia Cup Hockey 2022: गतविजेत्या भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. भारत आणि दक्षिण कोरियामधला सामना ड्रॉ झाला.

Asia Cup Hockey 2022: हॉकी संघाची दमदार कामगिरी, जपानला धक्का देत भारताने जिंकलं ब्राँझ मेडल
India vs japan
Follow us on

मुंबई: आशिया चषक हॉकी स्पर्धेत (Asia Cup Hockey Tournament) भारताचा जपान विरुद्ध सामना (India vs japan) झाला. ब्राँझ मेडलसाठी (Bronze Medal) ही लढाई होती. भारताने जपान विरुद्धचा हा सामना 1-0 ने जिंकला व ब्राँझ मेडलला गवसणी घातली. रुपिंदर पालने केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. रुपिंदर पालच्या गोलच्या बळावर भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली. ती त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. जपानाच्या संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण ते यशस्वी झाले नाहीत. काल दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना 4-4 असा बरोबरीस सुटला. त्यामुळे गतविजेत्या भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. भारत आणि दक्षिण कोरियामधला सामना ड्रॉ झाला. पण गोल फरकामधील अंतरामुळे दक्षिण कोरियाने अंतिम फेरीत प्रवेश केला.

जपानला सात पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण….

अंतिम फेरीत दक्षिण कोरियाचा सामना मलेशिया विरुद्ध होणार आहे. इंडोनेशिया जर्कातामध्ये ही स्पर्धा होत आहे. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताकडून रुपिंदर पालने गोल केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जपानाल दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण ते गोल करण्यात अपयशी ठरले. दुसऱ्या क्वार्टर अखेरीस भारताकडे 1-0 अशी आघाडी होती. जपानला एकूण सात पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण ते एकाही कॉर्नरच गोलमध्ये रुपांतर करु शकले नाहीत. त्या उलट भारताला फक्त दोनच पेनल्टी कॉर्नर मिळाले.

भारताच भविष्य उज्वल

भारताने आपला युवा संघ या स्पर्धेसाठी उतरवला होता. यात 12 खेळाडूंनी पदार्पण केलं. फक्त लाकरा आणि सिमरनजीत हे दोन अनुभवी खेळाडू संघामध्ये होते. टोक्यो ऑलिम्पिकमधील ब्राँझ पदक विजेत्या संघातही हे दोन खेळाडू होते. भारतीय हॉकी संघाला भेल सुवर्णपदक मिळवता आले नसेल, पण युवा खेळाडूंच्या कामगिरीने भविष्याबद्दल चांगली आस निर्माण केली आहे.

पराभवाचा हिशोब चुकता केला

भारतीय हॉकी संघाने जपानला हरवून सुपर 4 स्टेजची सुरुवात केली होती. पहिल्या मॅचमध्ये भारताने जपानला 2-1 ने हरवलं होतं. ग्रुप स्टेजमध्ये जपानने भारताचा 2-5 असा पराभव केला होता. भारताने जपान विरुद्ध विजय मिळवून लीग स्टेजमधल्या पराभवाचा हिशोब चुकता केला होता.