IND vs NZ : मुंबईच्या 23 वर्षाच्या क्रिकेटपटूला न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजसाठी टीममध्ये मिळू शकतं स्थान
IND vs NZ : वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची मालिका होईल, जी 22 ऑक्टोंबरपासून सुरु होईल. वनडे मालिका 4 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरु होईल.

मुंबईचा वेगवान गोलंदाज सूर्यांश शेडगेला न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या वनडे टीममध्ये स्थान मिळू शकतं. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध लिस्ट ए टुर्नामेंटमध्ये शेडगेने चांगलं प्रदर्शन केलं. 23 वर्षाच्या शेडगेने इंग्लंड विरुद्ध तीन टी20 सामने खेळले. त्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्या दुखापतीमधून सावरल्यानंतर तो पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलाय. पुडुचेरी येथे ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध अनौपचारिक वनडे मालिकेत त्याने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने प्रभावित केलं. वनडे टीममध्ये शेडगेची निवड होण्याची प्रबळ शक्यता आहे असं एका बीसीसीआयमधील सूत्राने सांगितलं. कसोटी मालिकेत चौथा वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीतला फलंदाज म्हणून नितीश कुमार रेड्डीची महत्वाची भूमिका असेल. रेड्डी वनडेमध्ये खेळणार नाही. कारण तो कसोटी मालिकेत खेळणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची मालिका होईल, जी 22 ऑक्टोंबरपासून सुरु होईल. वनडे मालिका 4 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरु होईल. भारत आणि न्यूझीलंडमध्ये पाच वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. वनडे वर्ल्ड कप 2027 च्या दृष्टीने ही वनडे सीरीज महत्वाची असेल असं कॅप्टन शुबमन गिलने आधीच म्हटलय. भारतीय टीम आपले सर्व कॉम्बिनेशन युज करण्याचा प्रयत्न करेल. खासकरुन ऑलराऊंडर शिवम दुबे वनडेमध्ये चांगलं प्रदर्शन करत नाहीय. हार्दिक पंड्या सतत दुखापतग्रस्त आहे. नीतीश कुमार रेड्डी ऐवजी सूर्यांश शेडगे ऑलराऊंडर म्हणून दिसू शकतो.
टीम इंडियाची लवकरच घोषणा
भारत आणि न्यूझीलंड मध्ये पहिली वनडे 4 नोव्हेंबरला होील. दुसरी 7 नोव्हेंबरला 10 नोव्हेंबरला तिसरा वनडे सामना होईल. 13 नोव्हेंबरला चौथा वनडे सामना आणि 15 नोव्हेंबरला शेवटची वनडे मॅच होईल. या वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. टी 20 आणि भारत अ संघाची आधीच घोषणा झाली आहे. वनडे आणि टेस्ट सीरीजसाठी टीमची घोषणा अजून बाकी आहे. भारतीय टीम 22 ऑक्टोंबरपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाईल. तिथे पाच टी 20 सामने आणि तीन प्रॅक्टिस मॅच होतील. त्यानंतर दोन मॅचची टेस्ट सीरीज होईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडे सीरीजमध्ये खेळताना दिसतील.