मैदानावर भारतीय खेळाडूला एक कृत्य करणं महागात पडलं, आयसीसीने थेट कारवाई केली
भारतीय महिला संघाची सलामीवीर शफाली वर्माला मैदानावर आता एक कृती करणं इतकं महागात पडलं ही थेट आयसीसीने कारवाई केली आहे.

Shafali Verma ICC Fined: भारतीय महिला संघाची सलामीवीर शफाली वर्माला रविवारी रायपूर येथे झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या दुसऱ्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आयसीसी आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल अधिकृतपणे ताकीद देण्यात आली आहे. तिसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी आलेल्या या बातमीमुळे आता भारतीय संघ अधिक सावधगिरीने हा सामना खेळेल.
खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन केल्याबद्दल शफाली दोषी आढळली. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेटचे साहित्य, कपडे, मैदानातील उपकरणे किंवा इतर मैदानी वस्तूंच्या अयोग्य हाताळणीशी संबंधित आहे. या कारवाईमुळे शफालीच्या शिस्तभंगाच्या नोंदीमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडण्यात आला आहे. गेल्या २४ महिन्यांतील तिचा हा पहिलाच गुन्हा आहे.
ही घटना झिम्बाब्वेच्या डावाच्या १२ व्या षटकात घडली. शफालीने श्री चरनीच्या गोलंदाजीवर मिड-ऑफला चिपो मुगेरी-तिरिपानोचा झेल सोडला. झेल सुटल्याने निराश झालेल्या शेफालीने रागाने चेंडू जमिनीवर फेकला. तिच्यावर भारतीय क्रिकेटसाठीच्या आयसीसी आचारसंहितेचे (ICC Code of Conduct for Cricket in India) उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला. शेफालीने आपली चूक कबूल केली आणि आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामना पंच पॅनेलच्या सदस्य जी. एस. लक्ष्मी यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली. परिणामी, औपचारिक सुनावणीची आवश्यकता भासली नाही. मैदानातील पंच वृंदा राठी आणि गायत्री वेणुगोपालन, तिसरे पंच अण्णा हॅरिस आणि चौथे पंच जननी नारायणन यांनी शेफालीवर आरोप ठेवला केला.
आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघनामध्ये किमान अधिकृत ताकीद आणि खेळाडूच्या सामना शुल्काच्या ५० टक्के इतका कमाल दंड असतो. याव्यतिरिक्त, खेळाडूच्या खात्यात एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स जोडले जाऊ शकतात. आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखाद्या खेळाडूने २४ महिन्यांच्या कालावधीत चार किंवा अधिक डिमेरिट पॉइंट्स जमा केले, तर ते निलंबन गुणांमध्ये रूपांतरित केले जातात आणि त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. दोन निलंबन गुण मिळाल्यास खेळाडूवर एक कसोटी, दोन एकदिवसीय किंवा दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बंदी घातली जाते, जे आधी येईल ते लागू होते. दोष गुण (डिमेरिट पॉइंट्स) ते मिळाल्याच्या तारखेपासून २४ महिन्यांपर्यंत खेळाडूच्या शिस्तभंगाच्या नोंदीवर राहतात, त्यानंतर ते काढून टाकले जातात.