Sunil Gavaskar: फक्त तीन खेळाडू न्यूझीलंडच्या नाकी नऊ आणू शकतात, सुनील गावस्कर असं का म्हणाले?
Sunil Gavaskar On Team India: माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपूर्वी आता एक विधान केले आहे.

Sunil Gavaskar On Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी आता भारतीय संघ न्यूझीलंडला पोहोचला आहे, आधी टी-२० मालिका रंगणार आहे. यानंतर वनडे आणि कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. आता या मालिकेपूर्वी माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी एक विधान केले आहे.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा विश्वास आहे की, “न्यूझीलंडमधील स्विंग आणि सीमच्या आव्हानावर मात करण्यासाठी फलंदाजांनी चेंडू शक्य तितका उशिरा खेळावा. न्यूझीलंड दौऱ्यात यशस्वी, शुभमन आणि देवदत्त यांच्याकडून मोठ्या खेळीची गावस्कर यांना अपेक्षा आहे. कसोटी सामन्यांपूर्वी बहुतेक खेळाडू एकदिवसीय आणि टी-२० मालिकांसाठी न्यूझीलंडमध्ये असतील. यामुळे त्यांना त्यांची दैनंदिन दिनचर्या आणि झोपेचे चक्र स्थानिक वेळेनुसार जुळवून घेण्यास मदत होईल. न्यूझीलंडमधील वेळेतील फरकाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला बराच वेळ लागतो. तेथील खेळपट्ट्यांवर गवत असेल आणि हवामान थंड असू शकते. चेंडू हवेत स्विंग होईल आणि खेळपट्टीवर आदळल्यानंतरही त्याला हालचाल मिळेल. फलंदाजी सोपी नसेल, पण एकदा स्थिरावल्यावर या खेळपट्ट्यांवर मोठी धावसंख्या उभारता येते. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या उपस्थितीमुळे भारतीय गोलंदाजी आक्रमणातही क्षमता आहे.
“फलंदाजांनी चेंडू शक्य तितक्या उशिरा खेळला पाहिजे. यामुळे त्यांना खेळपट्टीच्या शेवटच्या क्षणी होणाऱ्या हालचालीचा सामना करण्याची चांगली संधी मिळते. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर, फलंदाज हवेतील त्याची दिशा पाहून आपल्या पायांच्या हालचालीत बदल करू शकतो, परंतु चेंडू खेळपट्टीवर आदळल्यानंतरच्या हालचालींमध्ये यासाठी खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे, चेंडूच्या दिशेने हात पुढे करणे टाळले पाहिजे. बचावात्मक फटके खेळताना, हात सैल ठेवून चेंडू शरीराच्या जवळून खेळावा. हे तंत्र इंग्लंड आणि न्यूझीलंडसारख्या खेळपट्ट्यांवर उपयुक्त ठरते.” असं गावस्करांनी कबूल केले.
भारतीय कसोटी संघाची विशेष परीक्षा असणार आहे कारण मागील काही मालिकांमध्ये कसोटी संघाची कामगिरी हवी तशी पाहायला मिळाली नाही.