IND vs BAN थरारक सामन्यात बांगलादेशचा विजय, मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये जो ड्रामा रंगला तो सर्वच पाहत राहिले
IND vs BAN Match: शारजामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात थरारक सामना दिसून आला. 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स'मध्ये विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या बांगलादेश चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला ३ धावांनी पराभूत करून एक मोठा उलटफेर घडवला.

IND vs BAN Match Result Update: शारजामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात थरारक सामना दिसून आला. ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स’मध्ये विजेतेपदाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या बांगलादेश चॅम्पियन्सने इंडिया चॅम्पियन्सला ३ धावांनी पराभूत करून एक मोठा उलटफेर घडवला. १४२ धावांचे लक्ष्य असताना, भारताला त्यांच्या निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून केवळ १३८ धावाच करता आल्या. बांगलादेशच्या विजयात डावखुरा फिरकी गोलंदाज इनामुल हक ज्युनियर आणि अबू जायेद राही यांच्या अखेरच्या षटकांतील गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला शेवटच्या षटकात १२ धावांची गरज होती.
मॅचमध्ये काय घडलं?
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश चॅम्पियन्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे इंडिया चॅम्पियन्ससमोर 142 धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 12 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी पवन नेगी आणि पियुष चावला हे दोन फलंदाज मैदानावर उपस्थित होते.
बांगलादेशने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी अबू जायेदकडे सोपवली. पवन नेगीने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर एक वाईड चेंडू पडल्याने भारताला एक अतिरिक्त धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर पियुष चावलाने एक धाव घेतली, यानंतर तिसऱ्या चेंडूवर नेगीने पुन्हा एक धाव घेतली. अशाप्रकारे, पहिल्या तीन चेंडूंनंतर भारताच्या खात्यात एकूण चार धावा जमा झाल्या. त्यामुळे विजयासाठी भारताला उर्वरित तीन चेंडूंमध्ये आता आठ धावा करायच्या होत्या.
सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागण्याची आशा आणखी कायम होती. चौथ्या चेंडूवर पियुष चावलाने दोन धावा घेतल्यामुळे भारताला विजयासाठी सहा धावांची गरज होती. या परिस्थितीत मोठा फटका मारून सामना जिंकण्याची संधी होती. पण पियुष चावला आणि पवन नेगी यांनी या दोन चेंडूंवर प्रत्येकी एक धाव घेतली. परिणामी इंडिया चॅम्पियन्सला या षटकात केवळ आठ धावाच करता आल्या. बांगलादेश चॅम्पियन्सने तीन धावांनी थरारक शेवटच्या षटकांत विजय मिळवला.