iPhone Price Hike Reasons : आयफोनच्या किंमती वाढण्यामागचं नेमकं कारण काय? अॅपलने आधीच दिलेले संकेत
नवा iPhone 18 Pro लाँच झाल्यानंतर भारतात जुन्या आयफोनच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. iPhone 17 च्या 256GB मॉडेलची किंमत 82,900 रुपयांवरून 99,900 रुपये झाली असून 512GB मॉडेलची किंमत 1,24,900 रुपये झाली आहे.

नवीन आयफोन बाजारात आला की जुनी मॉडेल्स स्वस्त होणार आणि डिस्काउंटमध्ये फोन घ्यायचा, हा दरवर्षी हिशेब लावणाऱ्या भारतीय ग्राहकांचा यंदा भलताच पोपट झाला आहे. अॅपलने iPhone 18 Pro सीरिज लाँच तर केली, पण सोबतच जुन्या आयफोन्सच्या किमती वाढवून ग्राहकांना मोठा शॉक दिला. नेहमीप्रमाणे किमती कमी होण्याऐवजी कंपनीने जुन्या आयफोन्सच्या किमतीत थेट 15 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंतची प्रचंड वाढ केली आहे. थोडक्यात काय, तर iPhone 16, iPhone 17e, iPhone 17 आणि अगदी iPhone Air खरेदी करायचा असेल, तर आता खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
कोणता मॉडेल किती महागला?
नवा iPhone 18 Pro लाँच झाल्यानंतर भारतात जुन्या आयफोनच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. iPhone 17 च्या 256GB मॉडेलची किंमत 82,900 रुपयांवरून 99,900 रुपये झाली असून 512GB मॉडेलची किंमत 1,24,900 रुपये झाली आहे. iPhone 17e ची किंमत 64,900 रुपयांवरून 79,900 रुपये, तर iPhone 16 ची किंमत 69,900 रुपयांवरून 89,900 रुपये झाली आहे. सर्वात मोठी वाढ iPhone Air च्या किमतीत झाली असून तो 1,19,900 रुपयांवरून थेट 1,49,900 रुपयांना पोहोचला आहे.
अचानक किमती वाढण्यामागचं कारण काय?
सध्या फक्त ॲपलच नाही, तर अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्येही हेच चित्र आहे. या सगळ्यामागचं खरं व्हिलन ठरलंय ते म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सध्या जगभरात AI कंपन्या आणि डेटा सेंटर्सची प्रचंड लाट आली आहे. डेटा सेंटर्ससाठी मोठ्या प्रमाणावर मेमरी चिप्स आणि RAM ची गरज असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. याच AI आणि डेटा सेंटर्सच्या वाढत्या मागणीचा थेट परिणाम आता स्मार्टफोनच्या किमतींवर होत असल्याची शक्यता आहे. कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला असून मेमरी चिप्सच्याही किमती वाढल्या आहेत. याचा परिणाम ॲपलसह अँड्रॉइड स्मार्टफोनच्या किमतींवर होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, ॲपलने या वर्षाच्या सुरुवातीलाच मॅकबुक आणि आयपॅडचे भाव वाढवून या भाववाढीचे संकेत दिले होते.