लग्नाच्या काही दिवस आधीच भारत-पाकिस्तानी लेस्बियन कपलचा ब्रेकअप; तिने केला विश्वासघात

2019 मध्ये फोटोशूटमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलेल्या लेस्बियन जोडीचा ब्रेकअप झाला आहे. पाकिस्तानची सुफी मलिक आणि भारतीय अंजली चक्र यांनी लग्नाच्या काही दिवस आधीच ब्रेकअप केला आहे. सुफीने अंजलीचा विश्वासघात केल्याची कबुली दिली आहे.

लग्नाच्या काही दिवस आधीच भारत-पाकिस्तानी लेस्बियन कपलचा ब्रेकअप; तिने केला विश्वासघात
सुफी मलिक आणि अंजली चक्र
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 26, 2024 | 12:07 PM

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंजली चक्र आणि सुफी मलिक यांनी लग्नाच्या काही दिवस आधीच ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं आहे. अंजली ही भारतीय असून सुफी पाकिस्तानची आहे. 2019 मध्ये या दोघांनी आपलं लेस्बियन रिलेशनशिप जाहीर केलं होतं आणि तेव्हापासून दोघं सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. अंजलीची फसवणूक केल्याचं कबूल करत सुफीने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने लग्न मोडल्याचंही सांगितलं आहे. सुफी आणि अंजली हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्याच वर्षी दोघींनी साखरपुडासुद्धा केला होता. सुफीने न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगजवळ अंजलीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

आता लग्नाच्या काही आठवडे आधी सुफीने अंजलीची फसवणूक केल्याची जाहीर कबुली दिली आहे. ‘अंजलीचा विश्वासघात करून मी खूप मोठी चूक केली आहे. लग्नाला काहीच आठवडे शिल्लक असताना मी तिला खूप दुखावलंय. मी माझी चूक कबूल करतेय आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी घ्यायलाही तयार आहे. माझ्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनाही मी माझ्या या कृत्याने दुखावलं आहे’, असं सुफीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. तर दुसरीकडे अंजलीनेही सोशल मीडियावर पोस्ट लिहित लग्न मोडल्याचं सांगितलं आहे.

इतकंच नव्हे तर विश्वासघात केल्याप्रकरणी सुफीवर टीका करू नका, अशी विनंती तिने नेटकऱ्यांना केली आहे. सुफीने तिच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केलंय. तर अंजलीच्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सुफी मलिक आणि अंजली चक्र हे अमेरिकेतील मुस्लिम-हिंदू समलिंगी जोडपं आहे. 2019 मध्ये त्यांच्या जबरदस्त फोटोशूटसाठी दोघं चर्चेत आल्या होत्या.